Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (सूस-बाणेर-पाषाण) मधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी कोथरूड उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहू बालवडकर यांना तिकीट देण्यात आले आहे. अमोल बालवडकर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बंडखोरीचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांनी समजूत घालून माघार घ्यायला लावली. तरी या पक्षविरोधी भूमिकेमुळे मला भाजपाला मानणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याचाच परिणाम आता महापालिका निवडणुकीत उमेदवारीवर झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपने या प्रभागात प्रभावी काम करणाऱ्या आणि निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या लहू बालवडकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रभागातील इतर उमेदवारांमध्ये रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांचा समावेश आहे.
तिकीट न मिळाल्याने अमोल बालवडकर नाराज झाले असून, त्यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आता ते याच प्रभागातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. बालवडकर यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत, “भाजपला दाखवून देईन” असा इशारा दिला आहे. तर लहू बालवडकर यांनी त्यांना प्रत्युत्तर देत शिस्तबद्ध प्रचारावर भर दिला आहे.
या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक चुरशीची होणार असून, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात थेट सामना रंगणार आहे. अमोल बालवडकर यांनी पक्षांतरा नंतर घेतलेल्या भूमिकेमुळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि आरएसएस च्या केडरमध्ये प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळत आहे की नाराजी निवडणुकीच्या मतदानामध्ये पाहायला मिळण्याचे शक्यता आहे.

