Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढवणारे ॲड. निलेश निकम यांनी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली आहे. “नागरिकांना उत्कृष्ट आणि सुरक्षित घर मिळावं, यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीत यश मिळाल्यास सर्वप्रथम गृहनिर्माणाशी संबंधित प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये अनेक ठिकाणी पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन, तसेच मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ॲड. निकम म्हणाले की, नागरिकांना हक्काचे घर मिळणे हा केवळ विकासाचा मुद्दा नसून तो सामाजिक न्यायाशी संबंधित विषय आहे. पारदर्शकता, योग्य नियोजन आणि नागरिकांच्या सहभागातून गृहनिर्माण प्रकल्प राबवले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याशिवाय, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कायदेशीर बाबींमध्ये नागरिकांना योग्य मार्गदर्शन देणे, हेही प्राधान्यक्रमात असेल, असे त्यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करणे, हीच आपली कार्यपद्धती राहील, असा निर्धार ॲड. निलेश निकम यांनी व्यक्त केला आहे.

