बाणेर–बालेवाडी परिसरातील अनेक विकासकामे गेल्या काही काळापासून रखडलेली असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी ग्वाही माजी नगरसेवक लहू बालवडकर यांनी दिली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी या भागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली.
बालवडकर म्हणाले की, बाणेर–बालेवाडी हा झपाट्याने विकसित होत असलेला भाग असून येथे आयटी कर्मचारी, व्यापारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र अपूर्ण रस्ते, अर्धवट ड्रेनेज लाईन आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिकांना दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी महापालिकेतील संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रलंबित कामांना गती दिली जाईल.
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती, जलनिस्सारण व्यवस्थेची सुधारणा आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीचे निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
“नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडवणे हेच माझे ध्येय आहे. बाणेर–बालेवाडीचा सर्वांगीण विकास करून हा परिसर अधिक सुस्थित आणि राहण्यायोग्य बनवणार,” असा विश्वास लहू बालवडकर यांनी व्यक्त केला.

