तळेगाव (ता. मावळ) — कामशेत परिसरात उपसरपंचपदाच्या निवडणुकीतील राजकीय वादातून एका हॉटेल व्यावसायिकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. गुरुवारी (ता. ९) पहाटे सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नीलेश मोहन दाभाडे (वय ४४, रा. कामशेत, ता. मावळ) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते हॉटेल व्यवसायिक आहेत. तर ऋषिकेश सुरेश शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, कामशेत) असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दाभाडे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी सध्या फरार आहे.
कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत ग्रामपंचायतीची नुकतीच उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीतील राजकीय वादातूनच हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरुवारी पहाटे नीलेश दाभाडे हे घरासमोर उभे असताना आरोपी ऋषिकेश शिंदे दुचाकीवरून तेथे आला. त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी धारदार कोयता होता.
‘तुम्ही माझ्या आईला उपसरपंचपदाच्या निवडणुकीत का पाडले?’ असा जाब विचारत आरोपीने दाभाडे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी दाभाडे यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार करीत आहेत.

