पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबुराव चांदेरे व अमोल बालवडकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा करण्यात येत आहे.
अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण यांच्या कार्यकर्त्यांना नागरिकांकडून फोनद्वारे या प्रकाराची माहिती मिळाली. माहिती मिळताच कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी केली. या दरम्यान संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले गेले असून, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
घटनेच्या गांभीर्यामुळे पोलीस प्रशासन तसेच निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. संबंधित घटनेबाबत प्रशासनाला लेखी आणि तोंडी स्वरूपात माहिती देण्यात आली आहे.
सध्या पोलीस आणि निवडणूक आयोग या प्रकरणाची तपासणी करत आहेत आणि नेमकी कोणती कारवाई होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ही घटना प्रभाग ९ मधील राजकीय वातावरण अधिक तापवणारी ठरली आहे, आणि यामुळे पुढील निवडणूक प्रचार व मतदारांचा प्रतिसादही लक्षवेधी ठरणार आहे.

