निगडी पोलिसांची कारवाई….
पिंपरी : धनादेश वटण्यात अपयश आल्याच्या प्रकरणात ‘प्लॅनेट मराठी’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक व संचालक अक्षय बर्दापूरकर यांना निगडी पोलिसांनी शुक्रवारी (दि. ७) पिंपरी न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने यापूर्वीच समन्स जारी केले होते.
अक्षय बर्दापूरकर हे ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक असून या माध्यमातून त्यांनी विविध मराठी चित्रपट व वेब सिरीजची निर्मिती व वितरण केले आहे. ‘गोष्ट एका पैठणीची’, ‘चंद्रमुखी’ हे चित्रपट तसेच ‘रानबाजार’ ही वेब सिरीज त्यांच्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आली होती.
न्यायालयाकडून जामीन मंजूर……
चित्रबोली क्रिएशन या निर्मिती संस्थेने धनादेश वटले नसल्याच्या कारणावरून पिंपरी-चिंचवड न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रतिवादी अक्षय बर्दापूरकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स (वॉरंट) काढले होते. त्या आदेशानुसार निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला.
दरम्यान, ‘प्लॅनेट मराठी’ या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केल्याची माहिती समोर आली असून राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (NCLT) या प्रकरणात अवसायकाची नेमणूक केली आहे.
चित्रपटाच्या मोबदल्यावरून वाद…..
पुणे येथील चित्रबोली क्रिएशनने २०२३ साली ‘डायरी ऑफ विनायक पंडित’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, पिंपरी-चिंचवड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मुंबईतील यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल तसेच लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून विविध महोत्सवांमध्ये त्याला पुरस्कारही मिळाले होते.
यानंतर अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाचे ओटीटी प्रदर्शनासाठी निर्मात्यांशी करार करून ‘प्लॅनेट मराठी’वर तो रिलीज केला. मात्र, चित्रपटाच्या मोबदल्यापोटी देण्यात आलेला धनादेश वटला नाही, असा आरोप निर्मात्यांनी केला आहे. याच कारणावरून हा कायदेशीर वाद निर्माण झाला असून पुढील तपास व न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.


Leave a Reply