, , ,

पुण्यात हर्षवर्धन सपकाळांविरोधात गुन्हा दाखल; शिवाजी महाराज-टिपू सुलतान तुलना प्रकरणाने राजकारण तापले!

भाजपची आक्रमक भूमिका, काँग्रेस भवनासमोर घेराव आंदोलनाचा इशारा;

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मैसूरच्या शासक टिपू सुलतान यांच्याशी केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सपकाळ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९२, ९६(१), १९६(२), ३५२ आणि ३५६(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी मालेगाव येथील उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने सुरू झालेल्या वादाशी जोडली जात आहे. या घटनेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या कार्याची तुलना करत दोघेही शूर योद्धे असून त्यांना समकक्ष पाहिले पाहिजे, असे विधान केले होते. त्यांच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्याची संकल्पना पुढे नेली आणि शौर्य गाजवले, त्याच प्रेरणेतून टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला.

मात्र या वक्तव्यावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला आहे. शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी नगरसेवक स्मिता वसते, महेश वाबळे, साई थोपटे, गणेश घोष, ऋग्वेद उर्फ बप्पू मानकर आणि युवकाध्यक्ष दुशांत मोहोळ उपस्थित होते. भाजपच्या वतीने उद्या काँग्रेस भवनासमोर घेराव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून सपकाळ यांचे विधान हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आगामी काळात या प्रकरणावरून आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Newsnetwork360Marathi Pune BJP Congress BNS Shivaji Maharaj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *