,

PMC:पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांसाठी चुरस!

दहा जागांसाठी तब्बल 193 अर्ज; सात जागांवर भाजपची पकड, अंतिम फॉर्मुल्याकडे सर्वांचे लक्ष…

पुणे महानगरपालिकेच्या सत्तासमीकरणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीची उत्सुकता संपली आहे. सत्तेच्या प्रमुख खुर्च्या निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष वळले आहे ते स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांकडे. या दहा जागांसाठी राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू असून इच्छुकांची संख्या तब्बल 193 वर पोहोचली आहे.

महापालिकेच्या नियमांनुसार निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येच्या प्रमाणात स्वीकृत नगरसेवकांची संख्या ठरते. सध्या सभागृहात भाजपचे 119 नगरसेवक असल्याने सात स्वीकृत जागांवर भाजपचा दावा मजबूत आहे. उर्वरित तीन जागांपैकी दोन राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एक काँग्रेसला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित पक्षांमध्येही अंतर्गत चर्चांना वेग आला आहे.

स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींना महापालिकेकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून आतापर्यंत 193 जणांनी अर्ज सादर केले आहेत. यावरून या पदासाठी किती मोठी स्पर्धा आहे, हे स्पष्ट होते.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या काही इच्छुकांनीही स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र पक्ष नेतृत्वाने पराभूत उमेदवारांना या यादीत स्थान देणार नसल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे. तरीदेखील काही जणांनी आपले प्रयत्न कायम ठेवले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपच्या सात जागांबाबत अंतिम निर्णय स्थानिक नेतृत्वाच्या चर्चेनंतर घेतला जाणार असल्याचे समजते. शहरातील आमदार आणि खासदार प्रत्येकी एक नाव सुचवतील, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय होऊन अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे, या दृष्टीनेही सूत्रे हलत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदार-खासदारांच्या निकटवर्तीयांना प्राधान्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकंदरीतच, दहा स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी सुरू असलेली ही शर्यत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. अंतिम फॉर्मुला काय ठरणार आणि कोणाच्या पदरात स्वीकृत नगरसेवक पद पडणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Newsnetwork360marathi Pune NOC BJP Congress

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *