पुणे महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार थेट मैदानात; राष्ट्रवादी उमेदवारांना भाजपविरोधी लढ्याचा कानमंत्र
,

Pune: पुणे महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार थेट मैदानात; राष्ट्रवादी उमेदवारांना भाजपविरोधी लढ्याचा कानमंत्र

पुणे — भाजपच्या ताब्यात असलेली पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट पुण्यात ठाण मांडत निवडणूक रणधुमाळीत उडी घेतली आहे. उमेदवारांना केवळ सूचना देण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी स्वतः प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधत भाजपविरोधात ठामपणे कसे लढायचे, याचा कानमंत्र दिला आहे.

शिवाजीनगर येथील तरवडे क्लार्क्स इन येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व राष्ट्रवादी उमेदवार उपस्थित होते. अजित पवार यांनी एकेक उमेदवाराची विचारपूस करत आगामी निवडणुकीसाठी प्रचाराची स्पष्ट दिशा दिली.

“गेल्या काही वर्षांत तुम्ही प्रभागात काय काम केलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. घराघरात जा, लोकांशी थेट संपर्क ठेवा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. पुढचे आठ-दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे असून प्रचाराचे योग्य नियोजन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

भाजपच्या सत्तेत कोणती कामे रखडली, कोणती पूर्ण झाली नाहीत, हे लोकांसमोर मांडण्याचे आवाहन करत राष्ट्रवादी सत्तेत येणे पुण्यासाठी का गरजेचे आहे, हे ठसवून सांगण्यावर अजित पवार यांनी भर दिला. बैठकीदरम्यान उमेदवारांनीही आक्रमक प्रचाराला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याची भूमिका मांडली. एकूणच, अजित पवारांच्या सक्रिय सहभागामुळे पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

Newsnetwork360marathi