रेबीजने पुन्हा दाखवली जीवघेणी बाजू….
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील 33 वर्षीय तरुणाचा रेबीज या प्राणघातक आजारामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, संबंधित तरुणाला आवारा कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तातडीने लसीकरण व उपचार घेण्यात आले होते. मात्र, चाव्याच्या सुमारे तीन महिन्यांनंतर रेबीजची लक्षणे दिसून आली आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश राजेंद्र नागवडे असे मृत तरुणाचे नाव असून 6 नोव्हेंबर 2025 रोजी खामगाव परिसरात एका आवारा कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला होता. घटनेनंतर त्यांनी तात्काळ यवत ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. यावेळी त्यांना टिटॅनस इंजेक्शन, रेबीज प्रतिबंधक लस (Anti Rabies Vaccine – ARV) तसेच इम्युनोग्लोब्युलिन देण्यात आले होते.
त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच नायडू संसर्गजन्य रोग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या काळात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.
मात्र, 3 फेब्रुवारी 2026 रोजी अचानक त्यांच्यात रेबीजची लक्षणे दिसून आली. यामध्ये पाण्याची भीती (हायड्रोफोबिया), वाऱ्याची भीती (एअरोफोबिया) तसेच अस्वस्थपणा यांचा समावेश होता. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांचा फारसा परिणाम न होता 4 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोग्य विभागाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुत्रा किंवा कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास जखम त्वरित साबण व स्वच्छ पाण्याने किमान 15 मिनिटे धुवावी आणि विलंब न करता जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रेबीज लसीकरणाचा पूर्ण कोर्स वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
रेबीज हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा अतिशय गंभीर आजार असून एकदा लक्षणे दिसू लागल्यानंतर तो बहुतेक वेळा प्राणघातक ठरतो. त्यामुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता वेळेत योग्य उपचार घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.


Leave a Reply