पुणे (Pune News) — पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुजल विनोद ओसवाल असे मृत तरुणाचे नाव असून तो वानवडी परिसरात राहत होता. तो हिंजवडीतील एका खासगी कंपनीत कार्यरत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास सुजल कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहात गेला होता. बराच वेळ तो बाहेर न आल्याने कर्मचाऱ्यांना संशय आला. तपासणी केली असता, त्याने मोबाईल चार्जरच्या केबलने गळफास घेतल्याचे आढळून आले.
प्राथमिक तपासात सुजलने आत्महत्येपूर्वी नातेवाईकांना संदेश पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदेशात त्याने ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या व्यसनामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद केले होते. या कारणामुळे त्याच्यावर कर्जाचा ताण वाढल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
या घटनेची नोंद हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण आणि इतर बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

