
नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांची महापौरांकडे मागणी; ९० हून अधिक जवान पदोन्नतीपासून वंचित राहण्याची भीती
पुणे : शहराच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील सुमारे ९० कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण रखडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. वेळेत प्रशिक्षण पूर्ण न झाल्यास निश्चित वयोमर्यादा उलटून अनेक जवान भविष्यातील पदोन्नतीपासून कायमचे वंचित राहू शकतात, अशी चिंता संबंधित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांची भेट घेऊन प्रलंबित प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण करण्याची मागणी केली.
अग्निशमन विभागातील अनेक कर्मचारी ४३ ते ५३ वयोगटातील असून, भविष्यातील पदोन्नतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे विविध प्रशिक्षण कोर्सेस पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, २०२७ पर्यंत ती ५४ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत पुरेशा संख्येने कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले नसल्याने सुमारे ९० हून अधिक जवानांचे प्रशिक्षण अद्याप प्रलंबित आहे. परिणामी, अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपत आल्याने त्यांना पदोन्नतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नगरसेवक मानकर यांनी सांगितले की, “अग्निशमन दलाचे जवान आग, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण आणि मालमत्ता वाचवतात. केवळ तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होणे अन्यायकारक आहे.” तसेच, महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये भविष्यात नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्याची योजना असून, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे. त्यामुळे उपलब्ध अनुभवी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी देण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मानकर यांनी पुढे अशी मागणी केली की, वयोमर्यादा संपत आलेल्या जवानांसाठी नागपूर येथील महाविद्यालयाची आवश्यक मान्यता घेऊन संबंधित प्रशिक्षण पुण्यातच आयोजित करण्यात यावे. तसेच, २०२७ पूर्वी सर्व प्रलंबित प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेने तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा.
याबाबत महापौर मंजुषा नागपुरे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

Leave a Reply