पुणे मेट्रोची संकल्पना काँग्रेसच्या काळातच; भाजपने श्रेय घेऊ नये – पृथ्वीराज चव्हाण
, , ,

Pune: पुणे मेट्रोची संकल्पना काँग्रेसच्या काळातच; भाजपने श्रेय घेऊ नये – पृथ्वीराज चव्हाण

पुणे मेट्रो प्रकल्पाची संकल्पना, मंजुरी आणि पायाभरणी काँग्रेस सरकारच्या काळातच झाली असून भाजपने या प्रकल्पाचे श्रेय घेऊ नये, असा ठाम दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या ‘पुणेकरांचा अधिकारनामा’ या जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सतेज पाटील उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन नगरविकासमंत्री कमलनाथ यांनी पुणे मेट्रोला परवानगी दिली होती. तसेच मुख्यमंत्री असताना माझ्याच हस्ते पुणे मेट्रोचे भूमिपूजन झाले, हे सर्व कागदोपत्री उपलब्ध आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आपण स्वतः सातत्याने पाठपुरावा केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईनंतर पुण्याला मेट्रो मंजुरी देताना नागपूरला डावलणे योग्य ठरणार नाही, या विचारातून नागपूर मेट्रो प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

जेएनएनयूआरएम (JNNURM) योजनेअंतर्गत काँग्रेस सरकारने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर निधी दिला होता, याची आठवण करून देत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी जाहीर केलेल्या 80 हजार कोटी रुपयांच्या घोषणांवर ते म्हणाले, “घोषणा करायला पैसे लागत नाहीत. स्मार्ट सिटी आणि हायपरलूपसारख्या प्रकल्पांचे पुढे काय झाले, याचे उत्तर भाजपने द्यावे. केवळ घोषणा करून एकही प्रकल्प पूर्ण न करणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे.”

पुण्याच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, शहरात सध्या एकही नवीन कंपनी येत नाही. भ्रष्टाचार, वाढती वाहतूक कोंडी आणि कोलमडलेल्या पायाभूत सुविधांमुळे अनेक कंपन्या पुण्याबाहेर जात आहेत. वाढते प्रदूषण लक्षात घेता पुण्याची अवस्था लवकरच दिल्लीसारखी होण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सतेज पाटील यांनी पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुणेकरांची फसवणूक करत असल्याचा आरोप केला. दोन्ही पक्षांमध्ये ‘नुरा कुस्ती’ सुरू असून त्याचा फटका पुणेकरांना बसत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका करणे ही भाजप प्रदेशाध्यक्षाची वैचारिक दिवाळखोरी असल्याचेही पाटील म्हणाले.

Newsnetworkmarathi360