पुणे — “ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत, त्यांना कोणतीही चिंता नाही. विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले असून आता महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा इतिहास घडवून दाखवा,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकारनगर–पद्मावती येथे केले.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिंद्र ढवळे, पूनम हरीश परदेशी आणि नयना नितीन लगस यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भव्य प्रचार रॅली काढत नागरिकांशी थेट संवाद साधला. या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः “लाडक्या बहिणी राहणार एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी” या महिलांच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, प्रभाग ३६ मध्ये विविध विकासकामांमुळे आबा बागुल यांनी नागरिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. पायाभूत सुविधा, नागरी समस्या, पुनर्विकास यांसाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी दिला जाईल, अशी ग्वाही देत आबा बागुल यांना सातव्यांदा महापालिकेत पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी झालेल्या सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महिलांची मोठी उपस्थिती आणि युवकांचा सहभाग पाहता परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले. झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे, ५०० चौ. फूट घरांचा मिळकतकर माफ करणे, तसेच उद्योगभवन पुण्यात उभारण्यासाठी मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, आबा बागुल यांनी तळजाई टेकडी येथे ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, स्वयंपुनर्विकास प्रकल्प आणि एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पास गती देण्याबाबत मागण्या मांडल्या. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या नगरविकास विभागामार्फत निश्चित मार्गी लावण्याची ग्वाही दिली.

