,

PuneNews;”पुण्यात पंक्चर माफियाचा सुळसुळाट”

बाणेर–पाषाण भागात कामाला जात असाल तर ही बातमी वाचा….

पुणे :शहरात आतापर्यंत भूमाफिया, वाळू माफिया याबाबत ऐकायला मिळाले आहे. मात्र आता पुण्यात एक नवी माफिया सक्रिय झाली असून ती म्हणजे पंक्चर माफिया. बाणेर–सकाळनगर परिसरातून तुम्ही कामाला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

दुचाकी किंवा चारचाकीने कामाला जात असताना अचानक कोणी येऊन “अरे, गाडीत हवा कमी झाली आहे” असे सांगितले, तर तात्काळ त्याची स्वतः खात्री करून घ्यावी. अन्यथा जवळच्या पंक्चरच्या दुकानात गेल्यास तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. लक्ष आणि नजर चुकवून टोचणी मारून दुकानदार गाडी पंक्चर करतात आणि चांगला टायर निष्कामी होतो. हा प्रकार गेले काही दिवसांपासून नागरिकांच्या निदर्शनास येत आहे.

जाब विचारल्यास टोळीमार्फत मारहाणीची भीती असल्याने अनेक वाहनचालक तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत.

दुकानातील तीन ते चार जण आधीच १०० ते २०० मीटर अंतरावर थांबून वाहनचालकांवर नजर ठेवत असतात. विशेषतः महिला वाहनचालकांना लक्ष्य केले जात असल्याचे चित्र आहे. दुकानात आल्यानंतर चाकात पूर्ण हवा भरूनदेखील पंक्चर असल्याचे सांगितले जाते. काही वेळा वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मुद्दाम टोचणी मारून चाक पंक्चर केल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.

एकाच्या मागोमाग एक असे दोन, तीन, चार बनावट पंक्चर काढून प्रत्येकी ३०० ते ४०० रुपये आकारले जातात. यावरच न थांबता, “टायर खराब झाले आहे”, “केमिकल टाकले नाही तर टायर बदलावे लागेल” अशी भीती घालून आणखी पैसे उकळले जातात. सकाळच्या कार्यालयीन वेळेत घाईत असलेले वाहनचालक या सापळ्यात सहज अडकतात.

यापूर्वी खडकी आणि येरवडा परिसरात असे प्रकार उघडकीस आल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्तांनी कारवाई करत काही पंक्चर दुकानदारांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र आता पुन्हा या टोळ्यांचा सुळसुळाट वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची घटना घडली होती.

Newsnetwork360marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *