एक गंभीर जखमी, दोघे किरकोळ जखमी…..
लोणी काळभोर–थेऊर परिसरात शुक्रवारी रात्री एक भीषण रस्ते अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या फॉर्च्युनर कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने तीन जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फॉर्च्युनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील काकडे मळा–नायगाव रोडवर घडला. दुचाकीवरून प्रणय राहुल कांबळे (वय २५) आणि शुभम पंडित थोरे (वय २५) हे दोघे आपल्या घरी परतत होते. त्याच दरम्यान अक्षय अनिल कुंजिर (वय ३२) हाही त्यांच्या दुचाकीवर बसला होता. तिघेही एकाच दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या फॉर्च्युनर (वाहन क्रमांक 7771) या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेचा जोर इतका प्रचंड होता की दुचाकी रस्त्यावर फरफटत गेली आणि प्रणय कांबळे रस्त्यावर फेकला गेला. या अपघातात तो गंभीर जखमी होऊन काही काळासाठी बेशुद्ध झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय कांबळे यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली असून जबड्याचे फ्रॅक्चर झाले आहे. उर्वरित दोघांनाही हात-पाय व शरीराच्या इतर भागांना दुखापती झाल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
अपघातानंतर फॉर्च्युनर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याप्रकरणी जखमी प्रणय कांबळे यांच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवणे, अपघात घडवून पळ काढणे व गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष बरगजे करत असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देखील पोलीस करत आहेत.


Leave a Reply