,

Pune News:ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

भोर तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला….

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील किकवी–केंजळ गावाच्या हद्दीत एक अत्यंत हळहळजनक घटना घडली असून ऊसतोड कामगाराच्या पाच वर्षीय चिमुकल्याचा वन्यप्राण्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कृष्णा किरण सोनवणे (वय ५, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव) असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–सातारा महामार्गालगत असलेल्या किकवी–केंजळ शिवारात ऊसतोड काम सुरू होते. यावेळी कृष्णाचे आई-वडील आणि इतर कामगार ऊस तोडणीच्या कामात व्यस्त होते. त्याच दरम्यान कृष्णा पाठीमागील बाजूस उभ्या असलेल्या बैलगाडीच्या आसपास खेळत होता. काही वेळानंतर कृष्णा अचानक दिसेनासा झाल्याने आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी त्याची शोधाशोध सुरू केली. बराच वेळ शोध घेऊनही कृष्णा सापडला नाही. अखेर शिवारात सुमारे २०० मीटर अंतरावर कृष्णा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.

कृष्णाला कोणीतरी वन्यप्राणी पळवून नेऊन हल्ला केल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्याला भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. कृष्णाच्या अंगावर व गळ्याजवळ गंभीर जखमा आढळून आल्याने वन्यप्राण्याच्या हल्ल्याची शक्यता अधिक बळावली आहे.

परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आल्याने हल्ला करणारा वन्यप्राणी बिबट्या असावा, असा प्राथमिक अंदाज प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला, हे स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर कृष्णाच्या नातेवाईकांनी आणि पालकांनी टाहो फोडला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Newsnetwork360Marathi Pune News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *