'देऊळ बंद २'-आता परीक्षा देवाची" चित्रपटाचा १०० कोटींचा विक्रम

देऊळ बंद २- आता परीक्षा देवाची,हा चित्रपट २१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. आज ह्या चित्रपटाला अवघे ३९ दिवस झाले असून ३९ दिवसात १०० कोटींचा विक्रम केला आहे. सिटी प्राईड, कोथरूड येथे ३० जून २०२६ रोजी 'देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची' या चित्रपटाच्या १०० कोटींच्या विक्रमी यशानिमित्त संपूर्ण कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत जल्लोषात सेलिब्रेशन पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या या यशानिमित्त दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेता देवेंद्र गायकवाड (दया दादा) आणि अभिनेत्री संस्कृती बाळगुडे यांनी चित्रपटाचा प्रवास, चित्रीकरणातील अनुभव आणि या अभूतपूर्व यशामागील कारणांबाबत मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.

deulband 2Sakshi MEgha Prabhu

प्रवीण विठ्ठल तरडे : लेखक,दिग्दर्शक,अभिनेते

"स्वामींच्या आशीर्वादाने आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा विक्रम शक्य झाला"

मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाशिवाय १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल विचारले असता दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, "स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असताना कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाची गरज भासत नाही. मायबाप प्रेक्षकांनी आणि स्वामीभक्तांनी हा चित्रपट स्वतःचा समजून डोक्यावर घेतला. त्यामुळेच हा ऐतिहासिक विक्रम घडू शकला."

चित्रपटाच्या प्रचारासाठी त्यांनी महाराष्ट्रातील गावागावांत आणि शहराशहरांत जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधला. ग्रामीण भागातील अधिकाधिक लोकांना चित्रपट पाहता यावा यासाठी अनेक ठिकाणी सवलतीच्या दरात तिकिटांची उपलब्धता करून देण्यात आली. प्रेक्षकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याची ही रणनीती चित्रपटाच्या यशात महत्त्वाची ठरल्याचे त्यांनी सांगितले.

स्नेहल प्रवीण तरडे : अभिनेत्री

"प्रेक्षकांनी योग्य चित्रपटाला १०० कोटींचे यश दिले"

अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी मराठी प्रेक्षकांचे विशेष आभार मानले. त्या म्हणाल्या, "धार्मिक विषयासोबत सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे."

त्यांनी सांगितले की,"प्रेक्षकांनी योग्य चित्रपटाला १०० कोटींचे यश दिले" चित्रपटाच्या सुरुवातीलाच निर्मात्यांनी या चित्रपटातून होणारा नफा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठल्याचा आनंद अधिक मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रीकरणातील सर्वात कठीण प्रसंगाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, स्वामींना वारुळापासून घरी घेऊन जाणारा प्रवास हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक होता. प्रखर उन्हात चित्रीकरण करताना ओठ कोरडे पडणे, त्वचा लाल होणे अशा अडचणी आल्या; मात्र संपूर्ण टीमच्या मेहनतीने आणि स्वामींच्या कृपेने हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले.

deul band

देवेंद्र अरुण गायकवाड : लेखक,दिग्दर्शक,अभिनेते

"रेकॉर्ड कायम राहण्यासाठी नसतात, ते मोडण्यासाठीच असतात"

चित्रपटातील 'दया दादा' ही भूमिका साकारणारे देवेंद्र गायकवाड यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, "'सैराट', 'राजा शिवाजी' आणि आता 'देऊळ बंद २' हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील. या ऐतिहासिक चित्रपटाचा भाग असल्याचा मला मनापासून अभिमान आहे."

यावेळी त्यांनी टीममधील मैत्री आणि विश्वासाचा उल्लेख करत सांगितले की, "मैत्री जर निःस्वार्थपणे जपली, तर तिचे फळ मोठे मिळते. आमच्या टीमच्या एकजुटीचेच हे १०० कोटींचे यश आहे."

भविष्यातील मराठी चित्रपटांबद्दल आशावाद व्यक्त करत ते म्हणाले, "रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनलेले असतात. यापुढे येणाऱ्या मराठी चित्रपटांनी 'देऊळ बंद २'चा विक्रम मोडावा. प्रत्येक नवीन विक्रम मराठी चित्रपटसृष्टीला आणखी मोठी उंची देईल."

संस्कृती संजय बाळगुडे : अभिनेत्री

"प्रवीण दादांमुळे माझ्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली"

अभिनेत्री संस्कृती बाळगुडे यांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "'देऊळ बंद २' करताना मला खूप काही शिकायला मिळाले. माझ्या अभिनय प्रवासात मला पहिली मोठी ओळख मिळवून देण्यात प्रवीण दादांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या चित्रपटात काम करणे म्हणजे कलाकाराच्या कारकिर्दीची भक्कम सुरुवात होण्यासारखे आहे."

त्या पुढे म्हणाल्या की, प्रवीण तरडे यांचे दिग्दर्शन शिस्तबद्ध आणि कडक असले तरी त्यामागे कलाकाराकडून सर्वोत्तम काम करून घेण्याची प्रामाणिक भावना असते. "ते मोठ्या भावासारखे आहेत. सेटवर ते जितके शिस्तप्रिय असतात, तितकेच विनोदीही आहेत. गंभीर प्रसंगातही त्यांच्या एखाद्या उपमेने संपूर्ण टीममध्ये हशा पिकतो," असे त्यांनी सांगितले.

१०० कोटींच्या यशामागे प्रेक्षकांचे प्रेम

'देऊळ बंद २ – आता परीक्षा देवाची'च्या यशाचा आनंद व्यक्त करताना सर्व कलाकारांनी एकच भावना व्यक्त केली—या विक्रमामागे मायबाप प्रेक्षकांचे निस्सीम प्रेम, संपूर्ण टीमची मेहनत आणि चित्रपटातील सामाजिक व आध्यात्मिक आशय यांचे मोठे योगदान आहे. १०० कोटींचा टप्पा गाठणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक नवा मापदंड ठरला असून, भविष्यात आणखी मोठे विक्रम घडावेत, अशी अपेक्षाही कलाकारांनी व्यक्त केली.





Inline Article Ad 728x90