नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

नसरापूर चिमुकली अत्याचार व हत्या प्रकरण : अवघ्या ५५ दिवसांत न्याय; आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

nasrapur imageSAKSHI MEGHA PRABHU

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी मे महिन्यातील कोणतीही सुटी न घेता दिवस-रात्र मेहनत घेत तपास पूर्ण केला. समाजात संतापाची लाट उसळली होती. नागरिकांचा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला होता. आरोपीला आमच्या हवाली करा, अशी मागणी करत मुंबई-बंगळुरू महामार्ग नागरिकांनी रोखला होता. संतप्त जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसतानाही पोलिसांनी आणि न्यायालयाने "आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून योग्य तो न्याय देऊ," अशी ग्वाही दिली होती.

त्या शब्दावर ठाम राहत पोलिसांनी अवघ्या सोळाव्या दिवशी आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर केवळ "५५ दिवसांत" सर्व साक्षी, पुरावे आणि जबाबांची तपासणी पूर्ण करून आज (२९ जून २०२६) न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल जाहीर केला.


न्यायालयाने 'रेअरेस्ट ऑफ रेअर' प्रकरण म्हणून केली नोंद


निकाल वाचताना न्यायालयाने नमूद केले की, निर्भया प्रकरणानंतर महाराष्ट्रात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत. या प्रकरणात सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या "१२ महत्त्वाच्या निकालांचा आधार" न्यायालयासमोर ठेवला. हे सर्व निकाल नसरापूर येथील घटनेशी साधर्म्य असलेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने अंतिम निकालात नमूद केले की, घटनेच्या वेळी आरोपी पीडित चिमुकलीसोबत होता. मात्र तो तिच्यासोबत का होता, या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आरोपी देऊ शकला नाही. पोलिसांनी आरोपीविरोधातील प्रत्येक परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी जोडण्यात यश मिळवले. त्यामुळे आरोपीविरुद्धचे सर्व आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


पूर्वनियोजित कट, क्रूरता आणि समाजावर परिणाम


न्यायालयाने नमूद केले की, आरोपीने पूर्वनियोजन करून चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत क्रूर असून तो शांत डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला. त्यामुळे हे प्रकरण "रेअरेस्ट ऑफ रेअर" या श्रेणीत मोडते.

न्यायालयाने स्पष्ट केले की, कट रचून हत्या करणे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे आणि त्यानंतर तिचा खून करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. या घटनेने समाजाला मोठा धक्का बसला असून अशा गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचेही न्यायालयाने नमूद केले.


आरोपीचा गंभीर इतिहास; माफीस पात्र नसल्याचे न्यायालयाचे मत


निकाल वाचताना न्यायालयाने आरोपीचा पूर्व इतिहासही विचारात घेतला. आरोपीचा गंभीर गुन्हेगारी इतिहास असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच या प्रकरणात आरोपीने पीडित मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा छळ केला. पीडित मुलगी पूर्णपणे असहाय्य होती. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपीच्या वयाचा विचार करून त्याला दया दाखवण्यास कोणतेही कारण नाही. यापूर्वीही त्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले असून तरीही त्याच्यात कोणतीही भीती निर्माण झाली नाही. प्रत्येक वेळी आपण वाचतो, या वेळेसही काही होणार नाही, अशी त्याची मानसिकता होती, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.


'मरेपर्यंत फाशी'ची शिक्षा; न्यायालयाचे स्पष्ट निरीक्षण'


न्यायालयीन अधिकारी एस. आर. साळुंखे यांनी निकाल वाचताना म्हटले की, तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर करण्यात आलेले अत्याचार आणि त्यानंतरची हत्या अत्यंत निर्दयी स्वरूपाची आहे. पीडित मुलीकडे स्वतःचा बचाव करण्याचा कोणताही पर्याय नव्हता. आरोपी समाजासाठी धोकादायक असून त्याला माफी देण्यासारखी कोणतीही बाब न्यायालयासमोर आलेली नाही.

सरकारी पक्षाने मांडलेल्या १२ सर्वोच्च न्यायालयीन निर्णयांचा विचार करून आणि या प्रकरणातील सर्व परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच आरोपीचा इतिहास लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला *मरेपर्यंत फाशी* देण्याची शिक्षा सुनावली.

निकाल वाचताना न्यायालयाने नमूद केले की, "हा आरोपी समाजात राहण्यास पात्र नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोरातील कठोर शिक्षा आवश्यक आहे."


निकालानंतर कुटुंबीयांना अश्रू अनावर; तपास पथकाचे कौतुक


न्यायालयाचा निकाल जाहीर होताच पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे करण्यापूर्वी गुन्हेगार दहा वेळा विचार करतील, अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणात न्याय मिळवून देणे हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण "टीमवर्कचे यश" असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. तपासात सहभागी पोलीस अधिकारी, सरकारी वकील, डॉक्टर, पोस्टमॉर्टम करणारे वैद्यकीय अधिकारी आणि सर्व संबंधित यंत्रणांचे न्यायालयाने विशेष कौतुक केले.

या प्रकरणात एकूण "५५ साक्षीदारांची साक्ष" नोंदवण्यात आली. सर्व पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद करत, "हा माणूस कोणत्याही प्रकारच्या दयेचा पात्र नाही," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयीन अधिकारी एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला "मरेपर्यंत फाशी" देण्याचा अंतिम निकाल जाहीर केला.

Inline Article Ad 728x90