आंदोलनाच्या पद्धतीवर अमित ठाकरेंची टीका; पाठिंबा देण्यास नकार
जंतर-मंतरवरील NEET आंदोलनाला मनसे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा नाकारला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शांततेने आणि तथ्यांच्या आधारे आंदोलन व्हावे, असे सांगत त्यांनी आंदोलनातील गाणी, नृत्य आणि रिल्स संस्कृतीवर टीका केली. तसेच, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला.

मनसे नेते अमित ठाकरे यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या जंतर-मंतरवरील NEET विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. NEET परीक्षेतील कथित गोंधळ, पेपरमधील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा विषय अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर होणारे आंदोलन अधिक जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अमित ठाकरे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर आंदोलन करताना शांतता, संयम आणि तथ्यांचा आधार घेणे गरजेचे आहे. मात्र, जंतर-मंतरवरील काही आंदोलनांमध्ये गाणी-नृत्य, नाटकं तसेच सोशल मीडियासाठी रिल्स तयार करण्यासारखे प्रकार झाल्याने या गंभीर विषयाचे गांभीर्य कमी झाल्याची टीका त्यांनी केली.
त्यांनी पुढे म्हटले की, कोणतेही आंदोलन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडिया फॉलोअर्सच्या दबावामुळे चालवले जाऊ नये. आंदोलनामध्ये सत्यनिष्ठा, शिस्त आणि उद्देशाची स्पष्टता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाची दिशा योग्य असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी NEET परीक्षेला बसतात. मात्र, त्या तुलनेत जंतर-मंतरवरील आंदोलनाला अपेक्षित जनसमर्थन मिळाले नसल्याकडेही अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, अमित ठाकरे यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. वांगचुक यांच्या दीर्घ उपोषणामुळे त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत, त्यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.