जिल्हा परिषद शाळेतील पाहणी ठरली महागात? अभिजीत दिपकेंसह 6 जणांवर गुन्हा; नेमका आरोप काय?
औसा येथील जिल्हा परिषद शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत चित्रीकरण केल्याप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेची परवानगी न घेता चित्रीकरण, शिक्षकांच्या कामात अडथळा आणि धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, याच शाळेत ‘स्कूल चलो’ अभियानांतर्गत पाहणी करत दिपकेंनी खासगी शाळेतील विद्यार्थी आढळल्याचा दावा केला होता. आता त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
औसा : जिल्हा परिषद प्रशाला विभाग उर्दू, औसा येथील शाळेत अनधिकृत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत चित्रीकरण केल्याप्रकरणी ‘कॉकरोच जनता पार्टी’चे प्रमुख अभिजीत दिपके यांच्यासह सहा जणांवर औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे आणि अन्य चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास अभिजीत दिपके काही व्यक्तींसह शाळेत दाखल झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये बसून विविध प्रश्न विचारले. त्यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक आणि शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे.
शाळेची पूर्वपरवानगी न घेता चित्रीकरण करण्यात आले आणि हे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेतून आणून बसवण्यात आल्याचा दावा करत दिपके यांनी शाळेची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यावेळी शिक्षकांना अपशब्द वापरणे आणि त्यांना निलंबित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
‘स्कूल ठीक करो’ अभियानातून दिपकेंनी उपस्थित केले होते प्रश्न
दरम्यान, औसा शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत खासगी शाळेतील विद्यार्थी आढळून आल्याचा दावा ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या पाहणीदरम्यान अभिजीत दिपके यांनी केला होता. विद्यार्थ्यांसमोरच विचारणा केल्यानंतर संबंधित विद्यार्थी खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याचे सांगत असल्याचा दावा दिपके यांनी केला होता.
त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या आवारात खासगी शाळेतील विद्यार्थी कोणाच्या परवानगीने आणि नेमक्या कोणत्या कारणासाठी उपस्थित होते, असा सवाल दिपके यांनी उपस्थित केला होता.
मात्र, याच पाहणीदरम्यान शाळेत अनधिकृत प्रवेश, चित्रीकरण आणि शिक्षकांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप करत आता दिपकेंसह अन्य व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
सय्यद समशादबानो खैरातअली यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 488/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम 132, 329(3), 351(2), 356(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत. चित्रीकरण, शाळेत प्रवेशाची परिस्थिती आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे