बारामतीच्या श्रावणीचा देशभर डंका; NEET मध्ये मुलींमध्ये पहिला क्रमांक

बारामतीच्या श्रावणी कुदळेने री-नीट परीक्षेत देशात पाचवा, मुलींमध्ये पहिला आणि महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने 720 पैकी 710 गुण मिळवले असून बायोलॉजीमध्ये पूर्ण 360 गुण मिळवले. सातवीपासून नीटची तयारी करणारी श्रावणी आता दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनून देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रावणी कुदळेची Image

देशभरात NEET पेपरफुटीच्या वादाची चर्चा सुरू असतानाच री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात महाराष्ट्राच्या बारामतीची श्रावणी कुदळे हिने अभूतपूर्व यश संपादन करत देशात पाचवा क्रमांक, मुलींमध्ये पहिला क्रमांक आणि महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे श्रावणीवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

श्रावणीने 720 पैकी 710 गुण मिळवत आपल्या मेहनतीची चमक दाखवली. बायोलॉजीमध्ये तिने 360 पैकी 360 गुण मिळवत परिपूर्ण कामगिरी केली, तर केमिस्ट्री आणि फिजिक्समध्ये प्रत्येकी 175 गुण मिळवले. देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या NEET मध्ये मिळवलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि जिद्दीचे फळ आहे.

सातवीत असतानाच श्रावणीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याच वेळी NEET परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. आठवीत असताना तिने डॉक्टर बनण्याचा निर्धार केला होता. कॉलेजच्या वेळेशिवाय ती दररोज सुमारे सहा तास अभ्यास करत असे. मोबाईल, मनोरंजन आणि इतर अनेक आवडी-निवडींवर मर्यादा आणून तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. यश मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि आत्मविश्वास आवश्यक असल्याचे ती सांगते.

श्रावणीचे वडील कृष्णा कुदळे आणि आई जयश्री कुदळे हे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक आहेत. मुलीच्या या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. इतके मोठे यश मिळेल अशी अपेक्षा नव्हती, मात्र तिच्या मेहनतीवर विश्वास होता. आज तिच्या कष्टाचे चीज झाल्याचा आणि तिने कुटुंबासह राज्याचे नाव उज्ज्वल केल्याचा अभिमान असल्याची भावना तिच्या पालकांनी व्यक्त केली.

मूळची दौंड तालुक्यातील खडकी गावची असलेली श्रावणीने बारामतीतील अकॅडमीतून NEET ची तयारी केली. तिच्या शिक्षकांनी तिच्या जिद्दीचे, अभ्यासातील सातत्याचे आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणाचे भरभरून कौतुक केले आहे. पेपरफुटीच्या वादामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावात असताना त्याचा आपल्या तयारीवर किंवा मनोबलावर कोणताही परिणाम झाला नाही, असे श्रावणीने स्पष्ट सांगितले.

आता ती पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीला जाणार असून एक कुशल डॉक्टर बनून देशसेवा करण्याचे तिचे ध्येय आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्याची तिची इच्छा आहे.

श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री आणि बारामतीच्या आमदार सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच त्यांनी तिच्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचेही कौतुक केले. तसेच, "अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्रावणीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्रावणी कुदळेचे हे यश केवळ बारामती किंवा पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कठोर परिश्रम, सातत्य, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे श्रावणी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

Inline Article Ad 728x90