बावधनकरांचा RMC प्लांट्सविरोधात ‘ई-मेल ब्लिट्झक्रिग’; २ हजार ई-मेल्सचा मारा!
पुणे | ६ ऑक्टोबर २०२६: बावधन परिसरातील कथित बेकायदेशीर व प्रदूषणकारी RMC प्लांट्सविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ‘ई-मेल ब्लिट्झक्रिग’ आंदोलन सुरू केले आहे. पहिल्याच दिवशी २ हजारांहून अधिक ई-मेल्स विविध शासकीय यंत्रणांना पाठवण्यात आल्याचा नागरिकांचा दावा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तक्रारी, पाहण्या आणि नोटिसा होऊनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत नागरिकांनी येत्या तीन दिवसांत ५० हजारांहून अधिक ई-मेल्स पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

पुणे : बावधन परिसरातील कथित बेकायदेशीर आणि प्रदूषणकारी RMC प्लांट्सविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत ‘ई-मेल ब्लिट्झक्रिग’ आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडे गेल्या दोन वर्षांपासून वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी विविध शासकीय यंत्रणांना २ हजारांहून अधिक ई-मेल्स पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, येत्या तीन दिवसांत हा आकडा ५० हजारांहून अधिक होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. बावधनमधील नागरिकांनी MPCB, पुणे जिल्हाधिकारी, PMC आणि PMRDA यांच्याकडे RMC प्लांट्सबाबत तक्रारी, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर पुरावे सादर केल्याचे सांगितले आहे. काही प्लांट्सविरोधात पाहणी आणि नोटिसा झाल्या असून, बंद करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात प्लांट्सचे संचालन सुरूच असल्याचा आरोप आहे. बावधनमधील निवासी परिसरात सात RMC प्लांट्स असल्याचा दावा करत नागरिकांनी धूळ, प्रदूषण, काँक्रीट स्लरी आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे आरोग्य, पर्यावरण आणि वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे म्हटले आहे. काही प्लांट्स HEMRL च्या Defence-restricted zone जवळ असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. नागरिकांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव तसेच पर्यावरण व नगरविकास विभागाकडेही हा प्रश्न मांडला आहे. आता केवळ पाहणी आणि नोटिसा नकोत, तर प्रत्यक्ष आणि कायदेशीर कारवाई हवी, अशी मागणी बावधनकरांनी केली आहे. प्लांट्सविरोधात कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.