बावधनमध्ये रस्त्याची बिकट अवस्था; कऱण सनकोस्ट ते रायन स्कूल मार्ग धोकादायक

बावधन परिसरातील निसान शोरूमजवळील कऱण सनकोस्ट ते रायन इंटरनॅशनल स्कूलकडे जाणारा रस्ता खड्ड्यांनी आणि उखडलेल्या पृष्ठभागामुळे अत्यंत धोकादायक बनला असून विद्यार्थी, पालक आणि वाहनचालकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे.

bavdhan another case

पुणे : बावधन परिसरातील निसान शोरूमजवळील कऱण सनकोस्ट ते रायन इंटरनॅशनल स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा मार्ग वाहनचालकांसाठीच नव्हे, तर पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांसाठीही जीवघेणा ठरत आहे. मोठमोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि पावसाचे साचलेले पाणी यामुळे या मार्गावरून प्रवास करणे रोजचे आव्हान बनले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावरून जाताना दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच चारचाकी वाहनांच्या टायर, सस्पेन्शन आणि इतर भागांचे नुकसान होत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसानही होत आहे. शाळा परिसर असल्यामुळे सकाळी आणि दुपारी या मार्गावर वाहतुकीचा ताण अधिक असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना विशेष त्रास सहन करावा लागतो.

या भागातून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि वाहनचालक प्रवास करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शालेय बस, पालकांची वाहने आणि दुचाकीस्वारांना सतत अडचणी येत आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता किती खोल आहे, हे न दिसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढतो.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. केवळ तात्पुरती डागडुजी न करता या रस्त्याचे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्तीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाळा परिसरातील हा महत्त्वाचा रस्ता सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

bavdhan another one

दरम्यान, या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पुणे महानगरपालिकेने रस्त्याची पाहणी करावी आणि आवश्यक ती दुरुस्ती सुरू करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. नागरिकांच्या मते, प्रशासनाने वेळ न दवडता पावले उचलली नाहीत, तर या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Inline Article Ad 728x90