बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका! 28 ऑक्टोबरला किनारपट्टीला तडाखा बसण्याची शक्यता; अतिमुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे 26 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा धोका असून किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, पूर्व-मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे. 26 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून 28 ऑक्टोबरला ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचू शकते. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीसाठी चक्रीवादळपूर्व सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 48 तास महत्त्वाचे!
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 24 ऑक्टोबरला या कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये, तर 25 ऑक्टोबरला डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबरला चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. हे वादळ पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकत 28 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ पोहोचू शकते.
27 आणि 28 ऑक्टोबरला अतिमुसळधार पावसाचा धोका
या संभाव्य चक्रीवादळामुळे 27 आणि 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काकीनाडा, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कोनासीमा, एलुरु आणि एनटीआरसह विविध जिल्ह्यांना पावसाचा फटका बसू शकतो. ओडिशा आणि तेलंगणातील काही भागांतही 28 ऑक्टोबरला अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समुद्रातील हवामान बिघडण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, वादळाची नेमकी तीव्रता आणि किनारपट्टीवरील परिणाम पुढील हवामान अंदाजांनुसार अधिक स्पष्ट होतील.