विलास घुले केसमध्ये धक्कादायक खुलासा; उमेश मानेविरोधात गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. उमेश माने याच्याविरोधात एका महिलेने अत्याचार, ब्लॅकमेलिंग आणि धमकावल्याची तक्रार दिल्यानंतर केज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या नव्या घडामोडीमुळे प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्याप्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या उमेश मानेला वाचवण्यासाठी विलास घुले यांचा मृत्यू झाला होता, त्याच उमेश मानेविरुद्ध आता एका महिलेच्या तक्रारीवरून अत्याचार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, उमेश माने याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच या घटनेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार ब्लॅकमेल केले. या त्रासामुळे महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना रमेश घुले याने त्यांना अडवून पोलिसांकडे जाऊ नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे भीतीपोटी कुटुंबाने काही काळ गावातील घरात राहण्याचा निर्णय घेतला.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतरही विलास घुले आणि उमेश माने हे वारंवार तिच्या घराजवळ येऊन धमक्या देत होते. 3 जून रोजी विलास घुले याने घरात घुसून पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 20 जूनच्या रात्रीही दोघांनी घरासमोर येऊन शिवीगाळ आणि धमकावल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या वादावर तोडगा काढण्यासाठी 21 जून रोजी दोन्ही पक्षांची हॉटेलमध्ये भेट झाली. मात्र, तेथे झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याच झटापटीत विलास घुले यांचा मृत्यू झाला. पीडित महिलेने हा प्रकार स्वसंरक्षणात घडल्याचा दावा केला आहे.
या हत्येनंतर बीड जिल्ह्यात मोठे आंदोलन झाले होते. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात आला होता, तर विलास घुले यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून निषेधही व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीनंतर केज पोलिसांनी उमेश मानेविरुद्ध अत्याचार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या नव्या घडामोडीमुळे विलास घुले हत्याकांडाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे