बेंगळुरू: १३ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांवर गंभीर आरोप

बेंगळुरूमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शाळेतील शिक्षकांवर मानसिक छळ आणि अपमान केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून सुसाईड नोटच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

bengaluru

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील अनेकल तालुक्यातील मरसूर गावातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. सरकारी शाळेत इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे कारण घटनास्थळावरून पोलिसांना एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये शाळेत झालेल्या कथित मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची आई तिला उठवण्यासाठी गेली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी जप्त केलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये विद्यार्थिनीने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे एका शिक्षकाने तिला मारहाण केल्याचा आणि २० रुपयांचा दंड ठोठावल्याचा उल्लेख केला आहे. तसेच, शाळेत १० आणि २० रुपये चोरल्याचा खोटा आरोप करून इतर शिक्षकांनी सर्वांसमोर अपमानित केल्याचाही दावा तिने केला आहे.

चिठ्ठीत पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, दंड भरला नाही किंवा वर्तन सुधारले नाही तर शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) देऊन शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. या सततच्या मानसिक तणावामुळे आणि अपमानामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे लिहित तिने आपल्या कुटुंबीयांची माफीही मागितल्याचे समोर आले आहे.

या घटनेनंतर विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शाळेतील शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि शाळांमधील वर्तन पद्धतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, सूर्यनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सुसाईड नोटची सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आली आहे. तसेच शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

टीप: या प्रकरणातील काही आरोप हे कथित सुसाईड नोट आणि कुटुंबीयांच्या म्हणण्यावर आधारित आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Inline Article Ad 728x90