उपचाराच्या नावाखाली अत्याचाराचा धक्कादायक आरोप; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मौलवीला अटक
भिवंडीत आजार बरा करण्याच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर तंत्र-मंत्राच्या विधींच्या बहाण्याने अत्याचार केल्याचा आरोप झाला आहे. कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 50 वर्षीय मौलवीला भायखळा रेल्वे स्थानकातून अटक केली असून, व्हिडिओ कोणी तयार केले आणि प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
Ai Generated
ठाणे : भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी चौक परिसरातील एका दर्ग्यात आजार बरा करण्याच्या नावाखाली 30 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी दर्ग्यातील मौलवी मोहम्मद इस्माईल वारीस शेख (50) याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.
नेमकं काय घडलं?
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला एका खासगी रुग्णालयात असिस्टंट म्हणून काम करते. आजाराचा त्रास होत असल्याने नातेवाईकांच्या सांगण्यावरून ती 2024 मध्ये वऱ्हाळ देवी चौक परिसरातील हजरत सय्यद सुफी कुतुब अब्दाल जलालुद्दीन शाह रहमतुल्लाह दर्गाह येथे उपचारासाठी गेली होती.
मौलवीने आजार बरा करण्याचे आश्वासन देत तंत्र-मंत्र आणि विविध विधी करण्यास सुरुवात केल्याचा महिलेचा आरोप आहे. या विधींमध्ये केस सोडणे, हात पकडणे, लिंबू कापणे अशा प्रकारांचा समावेश होता. उपचाराचा भाग असल्याचे सांगत महिलेच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
रात्री दर्ग्यात बोलावून घेतल्याचा आरोप
महिलेच्या तक्रारीनुसार, उपचाराच्या नावाखाली तिला रात्री दर्ग्यात बोलावण्यात आले. त्यावेळी विविध विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे तिचे चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप आहे.
यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे, अत्याचाराचे व्हिडिओ तयार केल्याचे आरोपीने महिलेला सांगितल्याचा दावा तिने केला आहे. काही काळानंतर हे कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याचे आरोपीने फोनवरून सांगितल्याने महिला घाबरली.
पोलिसांची तातडीने कारवाई
यानंतर महिलेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी भायखळा रेल्वे स्थानकातून मोहम्मद इस्माईल वारीस शेख याला ताब्यात घेत अटक केली.
कोणाने तयार केले व्हिडिओ? तपास सुरू
या प्रकरणात कथित व्हिडिओ नेमके कोणी तयार केले, ते कुठून व्हायरल झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास भिवंडी शहर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी महाराष्ट्रातील नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66E आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील पुढील तपासात आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे