बालमित्रच बनला काळ! आधी कारने उडवलं, नंतर भररस्त्यात डोक्यावर वार; संभाजीनगर हादरलं!

छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक वादातून एका तरुणाची त्याच्याच बालमित्राने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीला कारने धडक दिल्यानंतर जखमी तरुणावर लाकडी दांड्याने वार करण्यात आले. या घटनेनंतर संशयित आरोपीने पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे.

CHH. Sambhajinagar_Crime

छत्रपती संभाजीनगर : बालपणापासूनची मैत्री, एकत्र केलेला व्यवसाय आणि त्यातून निर्माण झालेली स्पर्धा अखेर एका तरुणाच्या जीवावर बेतली. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात बालमित्रानेच आपल्या मित्राची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. मृत तरुणाचे नाव देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित असून, पवन दिलीप पाराशर असे संशयित आरोपीचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बंटी दीक्षित जिमवरून दुचाकीने घरी परतत होता. बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकादरम्यान पवनने कथितरीत्या कारने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे बंटी रस्त्यावर कोसळला. त्यानंतर पवनने कार वळवून पुन्हा घटनास्थळी येत जखमी बंटीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दांड्याने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमांमुळे बंटीचा मृत्यू झाला.

व्यावसायिक वादातून हत्येचा संशय

बंटी आणि पवन हे बालपणापासूनचे मित्र होते. दोघेही स्थानिक हॉटेल आणि बारमध्ये सुरक्षा पुरवण्याच्या व्यवसायाशी संबंधित होते. मात्र, व्यवसायातील वर्चस्व आणि जुन्या वादातून त्यांच्यात कटुता निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप तपासातून स्पष्ट झालेले नाही.

हत्या करून थेट पोलिस ठाण्यात!

या घटनेनंतर पवनने थेट सिडको पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. भरवर्दळीच्या रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामान्य नागरिकांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून केली आहे.

Inline Article Ad 728x90