हायकोर्ट लिपिक परीक्षेत नेमकं काय घडलं? संभाजीनगरात सर्व्हर डाऊननंतर परीक्षार्थींचा ठिय्या, कल्याणमध्येही गोंधळ

छत्रपती संभाजीनगरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर परीक्षा केंद्रावर हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाइन परीक्षेला सुरुवात होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला. तांत्रिक बिघाडामुळे शेकडो उमेदवारांची परीक्षा खोळंबली असून संतप्त परीक्षार्थींनी केंद्राबाहेर ठिय्या दिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. परीक्षा पुन्हा घेतली जाणार की अतिरिक्त वेळ दिला जाणार, याबाबत अद्याप निर्णय स्पष्ट झालेला नाही. दरम्यान, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर संगणकाच्या की-बोर्डमध्ये बिघाड झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली आहे.

Highcourt Clerk Exam

Ai Generated

छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात आज हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा होत असतानाच विविध परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणींचा सामना परीक्षार्थींना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे. त्यामुळे शेकडो उमेदवारांची परीक्षा खोळंबली.

दूरवरून परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अचानक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने केंद्रावर संतापाचे वातावरण निर्माण झाले. काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे खोळंबलेली परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार? याबाबत परीक्षा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. तांत्रिक बिघाडाचा फटका बसलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या दिल्याचे समोर आले आहे.

कल्याणमध्येही परीक्षेवेळी गोंधळ

छत्रपती संभाजीनगरनंतर कल्याणमध्येही हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना संगणकाच्या की-बोर्डमध्ये बिघाड झाल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे.

परीक्षेच्या ऐनवेळी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील घोळावरून देशभरात चर्चा सुरू असताना आता ऑनलाइन परीक्षांमधील तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, संभाजीनगरातील परीक्षा केंद्रावरील तांत्रिक बिघाडाबाबत प्रशासन काय निर्णय घेणार? परीक्षा पुन्हा होणार की अतिरिक्त वेळ मिळणार? याकडे आता परीक्षार्थींसह सर्वांचे लक्ष लागले आहे.


Inline Article Ad 728x90