मुलाने डोंगरावरून उडी घेतली; वाचवताना आई-वडिलांचाही तोल गेला, तिघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये १८ वर्षीय मुलाने डोंगरावरून उडी घेतल्यानंतर त्याला वाचवताना आई-वडीलही खाली पडले. या दुर्घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

Ai Generate
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८), त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता चांदवडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तिसगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल चांदवडे हा शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजता खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगराच्या कड्यावर असल्याची माहिती मिळताच त्याचे आई-वडील, तिसगावमधील ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कुणालची समजूत काढण्यासाठी कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून अनेक तास प्रयत्न करण्यात आले. तो आईशी संवाद साधत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, दुपारपर्यंत त्याला समजावून सांगण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.
मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा तोल गेला
दुपारी सुमारे एकच्या सुमारास परिस्थिती गंभीर झाली. कुणालला वाचवण्यासाठी त्याचे वडील त्याच्याजवळ गेले. यावेळी दोघांचाही तोल जाऊन ते खाली पडले. त्यानंतर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आईही खाली पडली. उंचावरून पडल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
तिसगावच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल सकाळपासून डोंगराच्या कड्यावर उभा होता आणि वारंवार जागा बदलत होता. त्याची आई सातत्याने त्याच्याशी बोलून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. शेवटच्या काही मिनिटांत कुणालचे वडीलही त्याच्याजवळ गेले होते.
अनेक तास सुरू होते समजावण्याचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. कुणालने टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी त्याला विविध प्रकारे समजावून सांगण्यात आले. पोलीस आणि अग्निशमन दलानेही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ प्रयत्न करूनही कुणालला सुरक्षितपणे तेथून खाली आणण्यात यश आले नाही. अखेर घडलेल्या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेमुळे तिसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.