EMI वेळेवर भरूनही क्रेडिट स्कोअर वाढत नाही? तुमच्या या चुका पडू शकतात महागात
वेळेवर EMI आणि क्रेडिट कार्डची बिले भरूनही क्रेडिट स्कोअर वाढत नसेल, तर त्यामागे क्रेडिट कार्डचा जास्त वापर, वारंवार कर्जासाठी अर्ज करणे, जुनी क्रेडिट खाती बंद करणे आणि क्रेडिट रिपोर्टमधील चुका ही कारणे असू शकतात. क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी वेळेवर पेमेंटसोबतच क्रेडिट वापर मर्यादित ठेवणे, कर्जाचे योग्य नियोजन करणे आणि नियमितपणे क्रेडिट रिपोर्ट तपासणे आवश्यक आहे.

मुंबई : आजच्या डिजिटल आणि कर्जाधारित अर्थव्यवस्थेत क्रेडिट स्कोअरला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. घर, कार, शिक्षण किंवा वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासतात. चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढते तसेच कमी व्याजदराचा लाभही मिळू शकतो.
मात्र, अनेक ग्राहकांची तक्रार असते की, क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरून आणि सर्व EMI नियमित भरूनही त्यांचा क्रेडिट स्कोअर अपेक्षेप्रमाणे वाढत नाही. याचे कारण केवळ पेमेंट हिस्ट्री नसून, क्रेडिट वापरण्याची पद्धत, कर्ज व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहारातील काही चुका असू शकतात.
अल्प कालावधीत अनेक कर्ज किंवा नवीन क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास Hard Inquiry ची संख्या वाढते. यामुळे ग्राहक वारंवार कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा संकेत जातो आणि त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जुनी क्रेडिट कार्ड खाती ग्राहकाचा क्रेडिट इतिहास मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे वापरात नसलेले जुने कार्ड बंद करण्यापूर्वी त्याचा क्रेडिट स्कोअरवर होणारा परिणाम समजून घेणे गरजेचे आहे.