'Gen-Z आणि Gen-Alpha कडे माहितीचा खजिना, पण ज्ञानाची कमतरता'; मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान!
आजच्या तरुण पिढीकडे तंत्रज्ञानामुळे भरपूर माहिती उपलब्ध आहे. मात्र, त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्याची जबाबदारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मातृभाषेतील शिक्षण, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबतही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

नागपूर : आजची जेन झी (Gen-Z) आणि जेन अल्फा (Gen-Alpha) पिढी तंत्रज्ञानाच्या युगात वाढत आहे. या पिढीकडे माहितीचा मोठा साठा असला, तरी त्या माहितीवर आधारित ज्ञानाची कमतरता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडील माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्याची मोठी जबाबदारी शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. नागपुरातील नवव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक परिषदेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.
मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर
विकसित देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलं जातं, तर अनेक विकसनशील देशांमध्ये पूर्वी राज्य केलेल्या देशांच्या भाषेत शिक्षण दिलं जातं, असं फडणवीस म्हणाले. मुलांच्या आयुष्यातील पहिली पाच वर्षं मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात मातृभाषेतील संवाद मुलांच्या विकासात मोठी भूमिका बजावतो. त्यामुळेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मोबाईल आणि सोशल मीडियाबाबत काय म्हणाले?
आज विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतल्याची तक्रार केली जाते. मात्र, मोठी माणसंही तितकीच मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. आपली एकाग्रता काही सेकंदांपुरती मर्यादित होत चालली आहे. त्यामुळे मोबाईल किंवा सोशल मीडियाला पूर्णपणे नाकारण्याऐवजी त्यांचा योग्य वापर कसा करायचा, यावर लक्ष देणं आवश्यक असल्याचं फडणवीस म्हणाले.
AI कडे मानवी संवेदना नाहीत!
कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, AI कडे मानवी संवेदना आणि नैतिक मूल्यं नाहीत. हीच मूल्यं आपल्या शिक्षण व्यवस्थेची खरी ताकद आहेत. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागांतील तंत्रज्ञानाची दरी कमी होत असून पुढील पाच वर्षांत ती संपुष्टात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.