E10 Petrol: E20 पेट्रोलमुळे मायलेज आणि इंजिनबाबत तक्रारी; जुन्या वाहनांसाठी पुन्हा E10 पेट्रोलचा पर्याय?

E20 पेट्रोलच्या वापरामुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये घट आणि काही पार्ट्सच्या देखभालीबाबत तक्रारी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जुन्या वाहनांसाठी पुन्हा E10 पेट्रोल उपलब्ध करण्याचा विचार करत आहे. E10 आणि E20 दोन्ही पर्याय उपलब्ध झाल्यास वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या क्षमतेनुसार इंधन निवडता येईल; मात्र दोन्ही इंधनांच्या स्वतंत्र वितरणासाठी सरकारसमोर पायाभूत सुविधांचे मोठे आव्हान असेल.

E10, E20

E10 Petrol Reintroduction : देशभरात E20 पेट्रोलचा वापर वाढल्यानंतर जुन्या कार आणि दुचाकींच्या वाहनधारकांकडून मायलेज कमी होणे आणि काही घटकांच्या देखभालीबाबत तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्या वाहनांसाठी पुन्हा E10 पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र सरकारकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

E10 पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉलचे मिश्रण असते, तर E20 पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल असते. भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर वाढवण्याच्या धोरणानुसार E20चा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. मात्र, जुन्या वाहनांच्या इंजिनची रचना आणि इंधनाची अनुकूलता लक्षात घेता वाहनधारकांकडून काही अडचणींबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

जुन्या वाहनांपैकी अनेक मॉडेल्स E10 इंधन लक्षात घेऊन तयार करण्यात आली होती. काही जुन्या वाहनांच्या वापरकर्ता मार्गदर्शिकांमध्येही इंधनातील इथेनॉलच्या प्रमाणाबाबत मर्यादा नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा वाहनांसाठी कमी इथेनॉल असलेले E10 पेट्रोल उपलब्ध असावे, अशी मागणी पुढे आली आहे.

दरम्यान, E20 पेट्रोलमुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन फेल्युअर होत असल्याच्या दाव्यांबाबत सरकारने वेगळी भूमिका मांडली आहे. उपलब्ध सर्व्हिस डेटाच्या आधारे E20मुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन फेल्युअर झाल्याचे आढळले नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. मात्र, E20मुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते, तसेच रबरचे भाग, सील आणि गॅस्केट यांसारख्या घटकांवर दीर्घकाळात परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध झाल्यास जुन्या वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या क्षमतेनुसार इंधन निवडण्याचा पर्याय मिळू शकतो. E10मध्ये इथेनॉलचे प्रमाण कमी असल्यामुळे जुन्या वाहनांच्या मायलेजवर होणारा परिणाम तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच, E10साठी डिझाइन केलेल्या जुन्या इंजिनमधील काही रबर आणि सीलिंग घटकांवरील ताणही कमी होऊ शकतो.

मात्र, E10 आणि E20 हे दोन्ही प्रकारचे पेट्रोल एकाच वेळी बाजारात उपलब्ध करून देणे सरकार आणि तेल कंपन्यांसाठी आव्हानात्मक ठरू शकते. दोन्ही प्रकारच्या इंधनासाठी स्वतंत्र साठवण टाक्या, वाहतूक व्यवस्था आणि पेट्रोल पंपांवरील डिस्पेन्सिंग सुविधांची आवश्यकता भासू शकते.

त्यामुळे E10 पेट्रोल पुन्हा उपलब्ध करण्याचा निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी कशी केली जाणार, कोणत्या वाहनांसाठी E10 उपलब्ध असेल आणि पेट्रोल पंपांवर दोन्ही प्रकारचे इंधन कशा पद्धतीने वितरित केले जाईल, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

Inline Article Ad 728x90