महाप्रसाद, लंगर अन् भंडाऱ्यांवर आता FDA ची नजर; सण सुरू होण्याआधीच होणार ‘सरप्राईज’ तपासणी

सण-उत्सवांच्या काळात भाविकांना आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आता अन्न व औषध प्रशासनाची थेट नजर असणार आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभर लागू राहणारा ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा निर्णय जाहीर केला आहे. सणाच्या 21 दिवस आधी सुरू होणारी तपासणी सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत सुरू राहणार असून, सणाच्या दिवशी अचानक तपासणीही केली जाणार आहे.

Tukaram Mundhe

मुंबई : गणेशोत्सव असो, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ किंवा नववर्षाची पूर्वसंध्या… सण आला की मिठाई, खवा, पनीर, तूप, सुकामेवा, मांसाहारी पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. याच काळात अन्नभेसळीची शक्यताही वाढते.

मात्र, यंदा अशा प्रकारच्या भेसळीवर लगाम घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने वर्षभरासाठीच विशेष यंत्रणा उभी केली आहे.

विशेष म्हणजे, महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांच्या ठिकाणी थेट जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सणाच्या दिवशी अन्न तयार करणाऱ्या आणि वाटप करणाऱ्या संस्थांवरही FDA ची नजर राहणार आहे.

तीन स्तरांत सणांचे वर्गीकरण

FDA ने वर्षभराचे सणांचे कॅलेंडर तयार करून त्यांचे तीन स्तरांत वर्गीकरण केले आहे.

  • प्रथम श्रेणी – राज्यव्यापी: गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ आणि नववर्ष पूर्वसंध्या.
  • द्वितीय श्रेणी – प्रादेशिक: मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण मास, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती.
  • तृतीय श्रेणी – स्थानिक: स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस.

यामुळे कोणत्या सणात कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांची तपासणी करायची, याचे नियोजन आधीच करता येणार आहे.

सणाच्या 21 दिवस आधीच सुरू होणार कारवाई

या मोहिमेची सुरुवात सणाच्या 21 दिवस आधी होणार असून, सण संपल्यानंतरही 30 दिवसांपर्यंत तपासणी आणि कारवाई सुरू राहणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया चार टप्प्यांत राबवली जाणार आहे.

1. पूर्वतयारी

हाय-रिस्क अन्नपदार्थांचे मॅपिंग, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना नमुने तपासणीसाठी पूर्वसूचना दिली जाईल.

2. नाका तपासणी

गिरण्या, घाऊक बाजारपेठा आणि अन्नाची वाहतूक यावर लक्ष ठेवले जाईल. विशेषतः पहाटेच्या वेळी नाका तपासणी केली जाणार आहे.

3. सणाच्या दिवशी ‘सरप्राईज’ तपासणी

आणि इथेच आहे या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा भाग!

सणाच्या दिवशी भरारी पथके अचानक महाप्रसाद, लंगर, भंडारे आणि इतर अन्नवाटपाच्या ठिकाणी पोहोचून तपासणी करणार आहेत.

4. थेट कायदेशीर कारवाई

अन्नाच्या गुणवत्तेत किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करून अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.

भगरपासून मटणापर्यंत… ‘हाय रिस्क’ पदार्थांवर नजर

उपवासाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या भगर, साबुदाणा आणि राजगिरा यांचे नमुने आधीच घेतले जाणार आहेत. बुरशीजन्य पदार्थांवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

मांस, पाणी आणि बर्फाच्या बाबतीत स्वच्छता, कोल्ड चेन आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासली जाईल.

मिठाईवरील चांदीचा वरख खरोखर शुद्ध चांदीचा आहे का? खाद्यरंग निर्धारित मर्यादेत वापरला आहे का? याचीही तपासणी होणार आहे.

प्रत्येक सणासाठी वेगळी रणनीती

FDA कडून सणानुसार वेगवेगळ्या खाद्यपदार्थांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळमध्ये बेकरी उत्पादने, तर रमजान आणि ईदच्या काळात विशेष अन्नपदार्थांची तपासणी केली जाणार आहे.

याशिवाय ई-कॉमर्सद्वारे विकले जाणारे अन्न, आयात केलेले खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने आणि पॅकबंद पाण्यावरही विशेष लक्ष राहणार आहे.

‘झिरो टॉलरन्स’; 14 दिवसांत खटला?

FDA ने या मोहिमेसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारल्याचे सांगितले आहे. सण संपल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 14 दिवसांच्या आत दोषींविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्याचे नियोजन आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यापुढे प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज भासणार नाही.

एकच स्थायी आदेश… आणि संपूर्ण वर्षभर सणांच्या काळात FDA ची नजर!

आता प्रश्न एवढाच—सणाच्या दिवशी अचानक येणाऱ्या FDA च्या भरारी पथकाच्या तपासणीत कोणते नमुने समोर येतात आणि नियम तोडणाऱ्यांवर किती कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Inline Article Ad 728x90