खाद्य तेलाबाबत FDAचा मोठा इशारा! भेसळ, बेकायदा मिश्रण अन् एक्सपायरी तेलाचा धक्कादायक प्रकार उघड; तुकाराम मुंढेंचा कडक आदेश
खाद्यपदार्थांतील भेसळीनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्य तेलाविरोधात कडक मोहीम सुरू केली आहे. नोंदणी नसलेले उत्पादक, मोहरी तेलातील अनधिकृत मिश्रण आणि एक्सपायरी तेलाचे रिपॅकिंग आढळल्याचे FDAने सांगितले. सुटे तेल न घेण्याचे आणि पॅकेजवरील लेबल, सील व एक्सपायरी डेट तपासण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

मुंबई : दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्य तेलावर लक्ष केंद्रित केले आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत खाद्य तेलाच्या दर्जाची आणि नियमांच्या पालनाची तपासणी अधिक कठोर करण्यात येणार असल्याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
FDAच्या तपासणीत नोंदणी नसलेले खाद्य तेल उत्पादक, तेलात अनधिकृत मिश्रण आणि मुदत संपलेल्या तेलाचे पुन्हा पॅकिंग केल्याचे प्रकार आढळल्याचे मुंढे यांनी सांगितले. विशेषतः मोहरी तेलात परवानगी नसलेले मिश्रण केले जात असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले आहे.
खाद्य तेल विक्रीसाठी आता कडक नियम
खाद्य तेलाच्या दर्जाबाबत FDAकडून Compliance Order काढण्यात येणार आहे. उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत खाद्य तेलाशी संबंधित असलेल्या सर्व आस्थापनांना हे नियम लागू असतील. यामध्ये उत्पादक, किरकोळ विक्रेते, किराणा दुकानदार आणि ऑनलाइन विक्रेत्यांचाही समावेश आहे.
FDAकडे खाद्य तेलाशी संबंधित 496 सेंट्रल लायसन्स नोंदणीकृत असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.
खाद्य तेलाची सुट्या स्वरूपात विक्री करता येत नाही, हा नियम आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे तेलाची विक्री केवळ पॅकेजिंगमध्येच करणे बंधनकारक आहे. किरकोळ विक्रेत्यांनीही सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन FDAकडून करण्यात आले आहे.
मोहरी तेलात मिश्रण केल्यास कारवाई
मोहरी तेल विकताना ते 100 टक्के मोहरी तेल म्हणूनच विकावे लागेल. त्यात अनधिकृत पद्धतीने इतर तेलाचे मिश्रण करता येणार नाही. सुट्या तेलाचा स्रोत आणि ते कधी तयार झाले याची माहिती अनेकदा उपलब्ध नसते. त्यामुळे अशा तेलाच्या वापरामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
तसेच खाद्य तेलाचे टिन किंवा कंटेनर पुन्हा वापरण्याचे प्रकारही आढळत आहेत. अशा पद्धतीने कंटेनरचा पुनर्वापर करण्यास मनाई असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.
तळणीचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका!
हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी एकाच तेलाचा वारंवार तळणीसाठी वापर केला जात असल्याचेही FDAच्या निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे वारंवार गरम केलेले तेल आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी तळणीचे तेल वारंवार वापरू नये, असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नागरिकांनीही बाहेर खाद्यपदार्थ खाताना अशा तेलाचा वापर होत असल्याचे जाणवल्यास सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नियम तोडल्यास 7 वर्षांपासून आजन्म कारावासाची तरतूद
खाद्य तेलामध्ये भेसळ करून नियमांचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते. भेसळ केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
ग्राहकांनी तेल खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सुटे खाद्य तेल खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. पॅकबंद तेल खरेदी करताना लेबल, सील आणि एक्सपायरी डेट तपासावी. तसेच घरातही तळणीचे तेल वारंवार वापरू नये.
भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्य तेलाचा प्रश्न केवळ ग्राहकांची फसवणूक करण्यापुरता मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे खाद्य तेलाच्या दर्जाबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे FDAने स्पष्ट केले आहे.