गणेशभक्तांनो, प्रवासाआधी हे नक्की वाचा! 'या' महामार्गांवर टोलमाफी, पण एक अट

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 11 ते 27 सप्टेंबरदरम्यान मुंबई-गोवा, मुंबई-बंगळुरू महामार्ग, अटल सेतूसह संबंधित मार्गांवर खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी देण्यात येणार आहे. मात्र, या सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ विशेष पास किंवा स्टिकर आवश्यक असणार आहे.

Kokan Darshan Toll Free 2026

मुंबई : आगामी गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणासह राज्यातील महत्त्वाच्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांना विशेष पास किंवा स्टिकर घेणे आवश्यक असणार आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी लागू राहणार आहे. मुंबई-गोवा महामार्गासह मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि अटल सेतूवरून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

नेमक्या कोणत्या मार्गांवर मिळणार टोलमाफी?

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांसाठी तसेच एसटी बसेससाठी ही टोलसवलत लागू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई-गोवा महामार्ग (NH-66), मुंबई-बंगळुरू महामार्ग (NH-48) आणि अटल सेतू (MTHL) यांचा समावेश आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDCच्या अखत्यारीतील संबंधित मार्गांवरही ही सवलत लागू राहणार आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, तसेच उत्सवाच्या काळात महामार्गांवरील वाहतूक व्यवस्थापन प्रभावीपणे करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

टोलमाफीसाठी 'हा' पास अत्यावश्यक

टोलमाफी मिळणार असली तरी कोणत्याही वाहनाला केवळ गणेशोत्सवासाठी प्रवास करत असल्याच्या आधारावर थेट सूट मिळणार नाही. वाहनावर 'गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन' असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे आवश्यक असणार आहे.

या पासवर संबंधित वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. गणेशभक्तांना हा पास पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमधून विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, हा पास केवळ कोकणाकडे जाण्याच्या प्रवासापुरता मर्यादित नसून परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य राहणार आहे.

एसटीच्या लालपरीलाही टोलमाफी

कोकणाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटी बसेसनाही टोलमधून पूर्ण सवलत देण्यात आली आहे. एसटी बसेससाठी पोलीस आणि RTO यांच्या समन्वयातून विशेष पासची व्यवस्था करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून कोकणाकडे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. त्यामुळे महामार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस, वाहतूक पोलीस,परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ यांच्यात समन्वय साधून विशेष वाहतूक नियोजन करण्यात येणार आहे.

मात्र, टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी पास कुठे आणि कसा मिळवायचा, हा प्रश्न अनेक गणेशभक्तांसमोर आहे. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित वाहनधारकांनी आवश्यक पास घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Inline Article Ad 728x90