गणेशोत्सवातील महाप्रसादावर FDAची नजर? तुकाराम मुंढेंनी स्पष्टच सांगितलं; नियम मोडल्यास कारवाई

गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्यांसाठी कोणता नवा नियम लागू करण्यात आला आहे का? या प्रश्नावर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भूमिका स्पष्ट केली. सण कोणताही असो, अन्नविक्री आणि अन्नवाटपाशी संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Tukaram_Mundhe

पुणे : गणेशोत्सव जवळ येत असताना गणेश मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि भंडाऱ्यांबाबत अन्न व औषध प्रशासनाची (FDA) भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना महाप्रसादासाठी कोणता नवा नियम लागू करण्यात आला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मुंढे यांनी कोणताही नवा नियम नसल्याचे स्पष्ट करत FDAची भूमिका स्पष्ट केली.

तुकाराम मुंढे म्हणाले की, हा विषय केवळ महाप्रसाद, भंडारा किंवा गणेशोत्सवापुरता मर्यादित नाही. "इट इज अबाऊट रेग्युलेशन्स", म्हणजेच संबंधित ठिकाणी अन्नविषयक नियमांचे पालन होत आहे की नाही, हा मुख्य मुद्दा आहे.

अन्न व्यवसायाशी संबंधित प्रत्येक घटकाने आवश्यक नोंदणी किंवा परवाना घेणे आणि निर्धारित मानकांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्यामुळे गणेशोत्सव असो किंवा अन्य कोणताही सण, विनापरवाना किंवा नियमांचे पालन न करता अन्नपदार्थ तयार अथवा वितरित केल्यास नियमानुसार कारवाई होऊ शकते, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.

FDAची ३१०० हून अधिक आस्थापनांवर तपासणी

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून ३१ जुलैपर्यंत राज्यातील अन्न क्षेत्राशी संबंधित ३१०० हून अधिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन आढळलेल्या १६५ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. तर ७५० हून अधिक आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

निलंबित परवान्यांपैकी सुमारे १०५ आस्थापनांनी FDA आयुक्तांकडे अपील केले. त्यापैकी सुमारे ७० आस्थापनांना दिलासा देण्यात आला असून, उर्वरित प्रकरणांमध्ये अंतिम आदेशाची प्रक्रिया सुरू आहे.

नियमांचे पालन केल्यानंतर संबंधित आस्थापनांची पुन्हा तपासणी केली जाईल. सुधारणा समाधानकारक आढळल्यास निलंबन मागे घेतले जाऊ शकते. मात्र, नियमांचे पालन न झाल्यास निलंबन कायम ठेवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

"व्यावसायिकांनी नियमांचं पालन केलं तर नियामकाची गरजच उरणार नाही," असेही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाप्रसादासाठी नवा नियम आहे का?

त्यामुळे गणेश मंडळांनी आयोजित केलेल्या महाप्रसाद किंवा भंडाऱ्यांसाठी नवा स्वतंत्र नियम लागू झालेला नाही. मात्र, अन्नविषयक विद्यमान नियम आणि मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास FDAकडून नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.

 

Inline Article Ad 728x90