राज ठाकरेंना सदावर्तेंचं थेट आव्हान; 15 दिवसांची मुदत, ‘तो’ फोटो काढला नाही तर...

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना भवनातील बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून सवाल उपस्थित करत सदावर्ते यांनी 15 दिवसांची मुदत दिली. तसेच DJ बंद करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं.

Raj Thackeray

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे ज्ञान पाजळावं, असा टोला लगावत सदावर्ते यांनी शिवसेना भवनातील एका फोटोवरून गंभीर सवाल उपस्थित केला. विशेष म्हणजे, संबंधित फोटो काढण्यासाठी त्यांनी थेट 15 दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा इशारा दिला आहे.

‘सांगा त्या उद्धवला बाळासाहेबांचा तो फोटो काढायला’

शिवसेना भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकत्र असल्याचा उल्लेख करत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.

“सांगा त्या उद्धवला बाळासाहेबांचा तो फोटो काढायला. हा अपमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा सदावर्ते यांनी दिला.

यासाठी त्यांनी 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत फोटो काढला नाही तर स्वतः न्यायालयामार्फत संघर्ष करणार असून, वेळप्रसंगी उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

राज ठाकरेंवरही बोचरी टीका

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सदावर्ते यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे ज्ञान पाजळावं,” असं म्हणत त्यांनी शिवसेना भवनातील फोटोचा प्रोटोकॉल काय आहे, असा सवाल केला.

तसेच “राज ठाकरे, तुम्ही किती मिनिटांत, किती तासांत हे फोटो काढता?” असा सवाल करत राज ठाकरे यांची अवस्था ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ अशी झाल्याची टीका सदावर्ते यांनी केली.

DJ बंद करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना आव्हान

DJ आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरूनही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिलं. “DJ बंद करून दाखवा,” असं म्हणत त्यांनी DJ वाजवण्यावर सरसकट बंदी नसावी, अशी भूमिका मांडली.

भीम जयंती ही दिवाळीप्रमाणे साजरी केली जाते आणि DJ वाजणारच, असंही ते म्हणाले. DJ मुळे कोणाला त्रास होत असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असं आवाहन सदावर्ते यांनी केलं.

संविधानाने सण साजरे करण्याचे नियम दिले आहेत

दरम्यान, सण-उत्सव साजरे करण्याबाबत संविधानाने नियम दिले असल्याचं ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. दहीहंडी उत्सवादरम्यान झालेल्या दुर्घटनांचा उल्लेख करत त्यांनी मृत्यू झालेल्या बालकाच्या कुटुंबाला सरकारने भेट देऊन शक्य ती मदत करावी, अशी मागणी केली.

दहीहंडीमध्ये जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

आता सदावर्तेंनी दिलेली 15 दिवसांची मुदत आणि त्यानंतर ते कोणती कायदेशीर पावले उचलतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Inline Article Ad 728x90