HSRP Number Plate: तुमच्या गाडीवर अजूनही जुनी नंबर प्लेट आहे? परिवहन विभागाच्या या कारवाईने वाढली धाकधूक!
राज्यातील लाखो वाहनांवर अद्याप HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नसल्याने परिवहन विभागाने आता कडक कारवाईची तयारी केली आहे. HSRP अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
मुंबई : हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP Number Plate न बसवणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नसल्याने आता परिवहन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. HSRP नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, रस्त्यावर वाहनांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 1 कोटी 10 लाख 84 हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98 लाख 8 हजार वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, अजूनही मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही.
जुन्या नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर नजर
HSRP नंबर प्लेटची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करणार असून, HSRP नसलेली किंवा अनधिकृत नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नियमानुसार HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात येत आहे.
HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?
HSRP म्हणजे High Security Registration Plate. ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली विशेष सुरक्षा नंबर प्लेट आहे. प्लेटवर क्रोमियम-आधारित अशोकचक्राचा होलोग्राम, लेझर-ब्रँडेड कायमस्वरूपी ओळख क्रमांक आणि ‘IND’ असा उल्लेख असतो. वाहनाच्या नोंदणी क्रमांकातील अक्षरे आणि अंकांवर हॉट-स्टॅम्प फिल्मचा वापर केला जातो.
ही नंबर प्लेट संबंधित वाहनाच्या डिजिटल नोंदणीशी जोडलेली असल्याने तिचा दुसऱ्या वाहनावर वापर करणे शक्य नसते.
HSRP नंबर प्लेटचे फायदे काय?
HSRP प्रणालीमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होण्यास मदत होते. बनावट नंबर प्लेटचा वापर, वाहन चोरी आणि वाहनांचा गैरवापर यांना आळा घालण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होऊ शकतो.
HSRP वरील विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे वाहनांची ओळख आणि नंबर प्लेटची पडताळणी करणे अधिक सोपे होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासही यंत्रणेला मदत मिळू शकते.
वाहनधारकांसाठी महत्त्वाचा इशारा
HSRP नंबर प्लेटसाठी वारंवार मुदत देण्यात आल्यानंतरही अनेक वाहनधारकांनी अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. आता विशेष पथकांकडून तपासणी सुरू होणार असल्याने जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेटवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.