जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानशी संबंधित संशयित नेटवर्कचा पर्दाफाश! 4 महिलांसह 6 जणांना अटक; 8 लाखांच्या व्यवहारांचा तपास

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बंदी घातलेल्या 'इत्तेहाद-उल-मुस्लिमीन' संघटनेशी कथित संबंध असलेल्या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश असून, या नेटवर्कला पाकिस्तानातून निधी मिळाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासात 7 ते 8 लाख रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आले आहेत.

Jammu-Kashmir News

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घातलेल्या 'इत्तेहाद-उल-मुस्लिमीन' संघटनेशी संबंधित कथित नेटवर्क उघडकीस आणले आहे. या प्रकरणात चार महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे नेटवर्क पाकिस्तानातील एका व्यक्तीच्या निर्देशांवर कार्यरत असल्याचा संशय आहे. तसेच महिलांच्या माध्यमातून फुटीरतावादी विचारसरणीचा प्रचार केला जात असल्याचाही पोलिसांचा दावा आहे.

15 गुप्त बैठका अन् 8 लाखांचे संशयास्पद व्यवहार

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी बांदीपोरा आणि परिसरात सुमारे 14 ते 15 गुप्त बैठका घेतल्याचा संशय आहे. यापैकी पाच ते सहा बैठका बांदीपोरा-बारामुल्ला मार्गावरील एका हॉटेलमध्ये झाल्या होत्या.

तपासात एका वर्षाहून अधिक काळात सुमारे 7 ते 8 लाख रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळले आहेत. यातील 2.26 लाख रुपये मुबिना बानो यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. उर्वरित रक्कम रोख स्वरूपात पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे.

तुरुंगातून पाकिस्तानशी संपर्क?

या प्रकरणाचा तपास वाहिद अहमद भट याच्यापासून सुरू झाला. 2022 मध्ये UAPA अंतर्गत अटक झाल्यानंतर कुपवाडा तुरुंगात असताना त्याने पाकिस्तानातील मंजूर अहमद शाह याच्याशी पुन्हा संपर्क साधल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यानंतर कथित नेटवर्कच्या माध्यमातून गुप्त बैठका आणि प्रचार सुरू झाल्याचा संशय तपासकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

चार महिलांसह सहा जणांना अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुबिना बानो, वाहिद अहमद भट, खुशबू जान, मेहक जान, आलिया जान आणि इरफान अहमद रेशी उर्फ रईस यांचा समावेश आहे. बांदीपोरा पोलीस ठाण्यात UAPA कायद्याच्या कलम 10 आणि 13 अंतर्गत गुन्हा क्रमांक 168/2026 दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय एका धार्मिक उपदेशकासह दोन संशयित कुरिअरच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे. संशयास्पद निधीचा मूळ स्रोत, पाकिस्तानशी कथित संबंध आणि नेटवर्कमधील इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Inline Article Ad 728x90