चर्चगेटमधील 'के. रुस्तम'वर FDA ची मोठी कारवाई; उंदरांचा सुळसुळाट

मुंबईतील प्रसिद्ध 'के. रुस्तम अँड कंपनी' आईस्क्रीम पार्लरवर FDA ने मोठी कारवाई केली. तपासणीत अस्वच्छता, उंदरांचा वावर, मुदतबाह्य फ्लेवर्स आणि नियमांचे उल्लंघन आढळल्याने पार्लर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

MUMBAI UNDIR NEWS

मुंबई: चर्चगेट येथील प्रसिद्ध 'के. रुस्तम अँड कंपनी' या आईस्क्रीम पार्लरवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे तपासणीत आढळल्याने पार्लरचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. प्रयोगशाळेचा अंतिम अहवाल येईपर्यंत आणि सर्व त्रुटी दूर होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात आणि साठवणुकीच्या ठिकाणी उंदीर व घरमाश्यांचा वावर आढळला. तसेच पिस्ता, स्ट्रॉबेरी, अननस, ब्लॅक करंट, चेरी, बदाम आणि 'रम जमैका'सह अनेक मुदत संपलेले फ्लेवर्स वापरात असल्याचे समोर आले. हे फ्लेवर्स अधिकाऱ्यांनी जागेवरच जप्त करून नष्ट केले.

तपासणीत आईस्क्रीम योग्य तापमानात साठवण्यासाठी आवश्यक असलेली 'कोल्ड चेन' व्यवस्था पाळली जात नसल्याचेही आढळले. बाह्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार आईस्क्रीममध्ये केवळ ७.९४ टक्के मिल्क फॅट आढळले. FSSAI च्या नियमानुसार आईस्क्रीममध्ये किमान १० टक्के मिल्क फॅट असणे आवश्यक आहे.

याशिवाय, अन्न सुरक्षेशी संबंधित आवश्यक नोंदी अपूर्ण असल्याचे तसेच कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र नसल्याचे तपासणीत समोर आले. या सर्व बाबींचा विचार करून अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) अंतर्गत पार्लरचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

१९५३ मध्ये सुरू झालेले 'के. रुस्तम अँड कंपनी' हे पार्लर आपल्या प्रसिद्ध आईस्क्रीम वेफर सँडविचसाठी ओळखले जाते. अनेक दशकांपासून मुंबईकर आणि पर्यटक या पार्लरला आवर्जून भेट देतात. मात्र, अन्न सुरक्षेतील गंभीर त्रुटी समोर आल्यामुळे सध्या या प्रसिद्ध पार्लरला टाळे लागले असून, अंतिम प्रयोगशाळा अहवाल आल्यानंतर आणि सर्व नियमांची पूर्तता झाल्यानंतरच ते पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Inline Article Ad 728x90