कट आधीच उघड? केतन प्रकरणात चेतनच्या वर्गमित्रावर पोलिसांची नजर
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्राचेही नाव समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट आधी त्यालाच सांगण्यात आला होता आणि लोहगड ट्रेकिंगलाही बोलावण्यात आले होते, पण त्याने नकार दिला. सध्या पुणे ग्रामीण पोलीस त्याची चौकशी करत असून, कॉल डिटेल्स, चॅट्स आणि डिजिटल पुरावे तपासत आहेत. मात्र, पोलिसांनी त्याला अद्याप आरोपी म्हणून घोषित केलेले नाही.

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आता आणखी एका तरुणाचं नाव समोर आलं आहे. देशभर चर्चेत असलेल्या या प्रकरणात चेतन चौधरीच्या वर्गमित्राचीही चौकशी सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केतनच्या हत्येचा कट सर्वात आधी याच वर्गमित्राला सांगण्यात आला होता.
चेतन चौधरी आणि सिया गोयल यांनी केतनला कसं संपवायचं, याबाबतही त्याच्याशी चर्चा केल्याचं समोर आलं आहे. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी सोबत येण्यासाठी त्याला विचारण्यात आलं होतं. मात्र, त्याने त्यांना नकार दिला.
या प्रकरणात आता पोलिसांसमोर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. केतनच्या हत्येचा कट माहीत असूनही चेतनच्या वर्गमित्राने पोलिसांना माहिती का दिली नाही, याचा तपास सुरू आहे. आरोपींचा कट ऐकूनही त्याने मौन का बाळगलं, यावर पोलिसांचा भर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनची हत्या झाल्यानंतर चेतन चौधरीने या वर्गमित्राची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने सिया गोयलशीही संवाद साधल्याचं समोर आलं आहे. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आणि सियासोबत काय बोलणं झालं, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा तरुण बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी भागातील एका खासगी कंपनीत काम करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याचं चेतन चौधरीशी बोलणं झाल्याचंही तपासातून स्पष्ट झालं आहे.
सध्या पोलिसांनी कॉल डिटेल्स, चॅट्स, लोकेशन हिस्ट्री आणि डिजिटल रेकॉर्डची तपासणी सुरू केली आहे. चेतन आणि सिया गोयल यांनी मिळून केतनला संपवण्याचा प्लान रचल्याची माहिती असली, तरी या तरुणाची भूमिका नेमकी काय होती, हे अजून स्पष्ट नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने केतनला मारू नका, असा सल्ला दिल्याचंही पुढे येत आहे.
पुणे ग्रामीण पोलीस या तरुणाची चौकशी करत आहेत. दोघांनी त्याला नेमकं काय सांगितलं, त्याने ही माहिती कोणाला दिली का, आरोपींनी त्याला कटाची माहिती का दिली, याचा तपास केला जात आहे. सध्या तरी पोलिसांनी त्याला आरोपी म्हणून घोषित केलेलं नाही.