केतन अग्रवाल केस: सिया-चेतनचे हत्येच्या ४ महिने आधीच गुपचूप लग्न? पोलिसांचा मोठा दावा
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या गुप्त लग्नाचा धक्कादायक दावा समोर आला आहे. तपासात डिलीट केलेले चॅट्स, फोटो आणि डिजिटल पुरावे मिळाल्याचे बोलले जात असून, हत्या पूर्वनियोजित आणि आर्थिक फायद्यासाठी रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिस सध्या विवाह नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि सायबर पुराव्यांची सखोल चौकशी करत आहेत.
.png)
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक 'ट्विस्ट' समोर आला आहे. केतनची होणारी पत्नी आणि मुख्य आरोपी सिया गोयल हिने हत्येच्या तब्बल चार महिने आधीच तिचा प्रियकर आणि या गुन्ह्यातील सहआरोपी चेतन चौधरी याच्याशी गुपचूप लग्न केले होते, अशी खळबळजनक माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या तांत्रिक फॉरेन्सिक तपासातून उघड झाली आहे.
पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे मोबाईल जप्त करून त्यांच्या सोशल मीडिया खात्यांची कसून तपासणी केली. सायबर फॉरेन्सिक टीमने त्यांच्या मोबाईलमधील डिलिट केलेला डेटा रिकव्हर केला असता, पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे लागले. या दोघांच्या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये त्यांच्या गुप्त लग्नाचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे. इतकेच नव्हे तर, एका खाजगी इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलिट केलेले काही फोटोही पोलिसांना मिळाले असून, त्या फोटोंमध्ये सिया आणि चेतन एकमेकांना लग्नाचा हार घालताना दिसत आहेत. या गुप्त लग्नाला साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या सियाच्या दोन कॉलेज मित्रांचीही ओळख पटली असून पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
तपासादरम्यान पोलिसांना या निर्घृण हत्येचे मुख्य कारण (मोटेव्ह) सापडले आहे. केतन अग्रवालच्या कुटुंबाने उदयपूर येथे होणाऱ्या आलिशान विवाह सोहळ्याच्या (Destination Wedding) बुकिंगसाठी सियाकडे तिची अधिकृत ओळखपत्रे आणि कायदेशीर कागदपत्रे मागितली होती.आपण आधीच विवाहित असल्याचे केतन आणि त्याच्या कुटुंबासमोर उघड होईल, या भीतीने सिया आणि चेतन पुरते घाबरले. आपले गुपित कायमचे लपवण्यासाठी आणि केतनकडून घेतलेले १ कोटी रुपये हडप करण्यासाठी त्यांनी केतनला लोहगड किल्ल्याजवळ बोलावून त्याचा काटा काढण्याचा अंतिम कट रचला.
सध्या दोन्ही आरोपी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून, पोलीस विवाह निबंधक (Marriage Registrar) कार्यालयातून त्यांच्या लग्नाची अधिकृत कागदपत्रे गोळा करत आहेत.