कोल्हापूर पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या गोळ्यांचा थरार; सराईत गुन्हेगार महेश दळवीची हत्या, मारेकरी फरार!
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दळवी यांचा मृत्यू झाला असून, दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. जयसिंगपूरजवळील दानोळी गावात सोमवारी (१९ ऑक्टोबर) सकाळी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात महेश बजरंग दळवी यांची हत्या करण्यात आली. दळवी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वृत्त आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
मिळालेल्या माहितीनुसार, दानोळी-जयसिंगपूर मार्गावरील चांदोली वसाहत परिसरात सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी महेश दळवी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे.
गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या दळवी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
हत्येमागे जुना वाद की दुसरे कारण?
महेश दळवी हे स्थानिक राजकारणातही सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणातून, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हल्लेखोरांनी दळवी यांनाच लक्ष्य का केले? या हत्येमागे कोणाचा हात आहे? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहेत.
जयसिंगपूर पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, त्यांच्या अटकेनंतर हत्येमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात सलग हत्यांच्या घटनांनी खळबळ
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच दानोळीतील गोळीबाराची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दानोळीतील हत्येचा उलगडा करून आरोपींना तातडीने अटक करण्याचे आव्हान आता जयसिंगपूर पोलिसांसमोर आहे.