चुलत्याचं 15 तोळे सोनं चोरून पुतण्याने घेतली थार! पूजेला चुलत्यालाच बोलावलं अन् झाला चोरीचा पर्दाफाश!
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात 19 वर्षीय तरुणाने चुलत्याच्या घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून त्यातून मिळालेल्या पैशांत नवी थार खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातून चोरी झाली, त्यांनाच गाडीच्या पूजेसाठी आमंत्रित केल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी पुतण्यासह सोनाराला अटक केली आहे.

कोल्हापूर : चुलत्याच्या घरातील सोन्याचे दागिने चोरून त्या पैशांत महागडी थार गाडी खरेदी केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील सातवे गावात उघडकीस आली आहे. समर पोपट चव्हाण (वय 19) असे संशयित तरुणाचे नाव आहे. त्याने चुलत्याच्या घरातून तब्बल 15 तोळे सोन्याचे दागिने चोरून ते विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी समरसह सोनार संग्राम मोरे याला अटक केली आहे.
चोरीच्या सोन्यातून खरेदी केली नवी थार!
सातवे गावातील उमेश मारुती चव्हाण यांच्या घरात समरचे नियमित येणे-जाणे होते. याचाच फायदा घेत त्याने घरातील सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 14 लाख 50 हजार रुपये असल्याचे वृत्त आहे. चोरीचे दागिने सोनार संग्राम मोरे याच्याकडे विकून समरने सुमारे 10 लाख रुपये मिळवले. या पैशांत त्याने नवीन महिंद्रा थार गाडी खरेदी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
थारच्या पूजेचे आमंत्रण अन् चोरी उघडकीस!
विशेष म्हणजे, नवीन थार खरेदी केल्यानंतर समरने चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना गाडीच्या पूजेसाठी बोलावले होते. याच सुमारास चव्हाण कुटुंबीयांनी घरातील सोन्याचे दागिने शोधले असता ते गायब असल्याचे लक्षात आले. मात्र, आजीचे दागिने सुरक्षित असल्याने चोरी करणारी व्यक्ती घरातील किंवा जवळच्या ओळखीची असावी, असा संशय निर्माण झाला.
दरम्यान, समरने अचानक महागडी थार खरेदी केल्याने त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला. उमेश चव्हाण यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत समरने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुतण्यासह सोनाराला अटक; पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी कोडोली पोलिसांनी समर चव्हाण आणि चोरीचे दागिने खरेदी करणारा सोनार संग्राम बाबासाहेब मोरे या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी थार गाडीसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत ठिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.