कोथरूडमध्ये भररस्त्यात मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
पुण्यातील कोथरूड येथे 35 वर्षीय मोबाईल व्यावसायिक अमित सुरेश शिंदे यांच्यावर 8 ते 10 जणांच्या टोळीने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी संध्याकाळी भररस्त्यात मोबाईल व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. कोथरूड स्टँडजवळील हॉटेल कोकण एक्सप्रेससमोर 35 वर्षीय अमित सुरेश शिंदे यांच्यावर 8 ते 10 जणांच्या टोळीने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात अमित शिंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोर अचानक घटनास्थळी आले आणि अमित शिंदे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर तेथून पसार झाले होते. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
प्राथमिक तपासात काही महिन्यांपूर्वी अमित शिंदे यांनी बनावट सिमकार्ड विक्रीप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण मकोका अंतर्गत कारवाईशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारीचा राग मनात ठेवूनच संबंधित टोळीने हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गुन्हे शाखा आणि अलंकार पोलीस ठाण्याची पथकेही तपासात सहभागी झाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे कोथरूड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.