अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीला मिळणार 2 हजार रुपये; 42 कोटींचा निधी मंजूर
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी सरकारने दिवाळीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. तब्बल 2 लाख 14 हजार 97 अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी शासनाने 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात येणार आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
2 लाख 14 हजार महिलांना मिळणार लाभ
राज्यात सध्या 1 लाख 8 हजार 627 अंगणवाडी सेविका आणि 1 लाख 5 हजार 470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अशा एकूण 2 लाख 14 हजार 97 महिलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. सर्व पात्र सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यासाठी शासनाने 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांच्या पोषणासह आरोग्यविषयक विविध उपक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कार्याची दखल घेत दिवाळीच्या निमित्ताने आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही 5 हजारांची अग्रीम मदत
दुसरीकडे, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5 हजार रुपयांची अग्रीम रक्कम जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. तसेच आणखी 40 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट आणि शेतकऱ्यांना अग्रीम मदत देण्याच्या निर्णयांमुळे दिवाळीपूर्वी दोन्ही घटकांना आर्थिक आधार मिळणार आहे.