मंत्रिमंडळ बैठकीत 4 मोठे निर्णय; तुकाराम मुंढेंच्या मोहिमेचा ‘हा’ परिणाम, महाराष्ट्रासाठी सरकारचा मोठा प्लॅन!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अंमली पदार्थांचे उच्चाटन, आरोग्यदायी अन्नपदार्थ, सोलापूर उन्नत मार्ग आणि कुकडी पाटबंधारे प्रकल्पाबाबत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Devendra Fadanvis_Tukaram Mundhe

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (1 सप्टेंबर) महाराष्ट्र सरकारची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित होत्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही कारणास्तव बैठकीला गैरहजर होते. या बैठकीत राज्याच्या विकास आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधातील कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदायी अन्नपदार्थांबाबत सरकारने घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.

2029 पर्यंत महाराष्ट्र ‘नशामुक्त’ करण्याचा संकल्प

मंत्रिमंडळाने सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोनाचे धोरण मंजूर केले आहे. ‘नशा मुक्त भारत अभियान’ाच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांच्या समन्वयातून अंमली पदार्थांविरोधात व्यापक कारवाई करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

सरकारी बैठका आणि कार्यक्रमांमध्ये आरोग्यदायी मेन्यू बंधनकारक

सरकारी आणि निमशासकीय बैठका, विविध कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यामध्ये संतुलित मेन्यू ठेवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

सोलापूरच्या उन्नत मार्गाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ दर्जा

सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानच्या उन्नत मार्ग प्रकल्पाला निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरील प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704 कोटींची तरतूद

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5 हजार 704 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 1 लाख 44 हजार 912 हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा प्रभाव?

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात कारवाई सुरू आहे. त्यांच्या कडक प्रशासकीय शैलीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अशातच सरकारी कार्यालये, बैठका आणि कार्यक्रमांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ उपलब्ध करण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने आजच्या बैठकीत आरोग्य आणि अन्नसुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिल्याचे दिसून आले.

Inline Article Ad 728x90