मेहकरच्या सरकारी रुग्णालयाची धक्कादायक अनास्था; रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी हाकेच्या अंतरावरही कोणी नाही!
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसूतीच्या गंभीर अवस्थेत महिला मदतीसाठी तडफडत असताना रुग्णालयातील स्टाफ नर्सने बाहेर येण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत खासगी रुग्णालयातील नर्सच्या मदतीने महिलेची प्रसूती केली. आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Ai Generated
बुलढाणा : जिल्ह्यातील मेहकरमध्ये सरकारी आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर एका महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे, महिला अत्यंत गंभीर अवस्थेत असताना मदतीसाठी रुग्णालयातील कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिसे परिवारातील या महिलेला सकाळी सुमारे सहा वाजता अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. घरात तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कोणी नसल्याने ती स्वतःच रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र, रुग्णालयाजवळील एका ओट्यावरच ती अचानक कोसळली.
यावेळी महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती. बाळाचा काही भाग बाहेर आला होता, तर काही भाग आतच असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या योगेश सौभागे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गाठले.
सौभागे यांनी स्टाफ नर्सला घटनेची माहिती देत तातडीने मदतीसाठी येण्याची विनंती केली. मात्र, “रुग्णालयात कोणीही नाही, डॉक्टरही नाहीत, मी एकटी आहे, त्यामुळे बाहेर येता येणार नाही,” असे सांगून नर्सने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप सौभागे यांनी केला.
महिलेची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे सांगून पुन्हा मदतीची विनंती करण्यात आली. मात्र, तरीही मदत मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अखेर सौभागे यांनी एका खासगी रुग्णालयातील स्टाफ नर्सची मदत घेतली. स्थानिक महिलांच्या सहकार्याने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली.
प्रसूतीनंतर महिला आणि बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे मेहकर ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नाईट ड्युटीवर डॉक्टर उपस्थित नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही डॉक्टरांचे खासगी रुग्णालय असल्याने ते सरकारी रुग्णालयातील सेवेकडे दुर्लक्ष करतात, असा आरोपही स्थानिकांकडून करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊनमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.